*.
*डॉ. हेमंत सोननीस*
*मानसोपचार तज्ञ, नाशिक*

वीस बावीस वर्षांपूर्वी जीमेलवर अकाउंट सुरू करणे काहीतरी वेगळे वाटत असे. त्या वेळेस याहू , हॉटमेल, रेडीफमेल जास्त वापरले जायचे .काही वर्षांनी स्मार्ट फोन आले. एका महिन्यात दीड जीबी डेटा वापरायला मिळत असे. दहा पंधरा वर्षांपूर्वी फेसबुक , व्हाट्सअप कुतूहल म्हणून वापरायला लागलो. आणि बघता बघता विमान हवेत उड्डाण करते तसा अचानक डिजिटलीकरणाने वेग घेतला. गेल्या पाच सात वर्षात डिजिटलीकरण झपाट्याने वाढले. त्यात उरली सुरली काही कसर राहिली होती भरून निघाली लॉकडाऊन मध्ये! मानसिक आजार कोविड संक्रमणात मोठ्या प्रमाणात वाढले. उदासिनता, भीतीचे अटॅक, भयगंड ,आँब्सेसिव्ह कम्पल्सिव आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत . काही नवीन व्यसने आणि आजार गेल्या काही वर्षांत जन्माला आले. काही कळायच्या आत त्यांनी मोठे स्वरूप देखील धारण केले.
*इंटरनेट अँडिक्शन* ,सोशल मीडिया अँडिक्शन, मोबाईल गेम, व्हिडिओ गेम यांचे व्यसन, sexting – लैंगिक , अश्लील मेसेज ,फोटो यांची सोशल मीडिया वरून देवाण-घेवाण . डिस्टन्स रिलेशनशिप – एकमेकांना न भेटता सोशल मीडियावरून ओळख होणे आणि प्रत्यक्ष भेटायाच्या आतच एकमेकांच्या प्रेमात पडणे . त्यातून बऱ्याचदा मुलींना त्यांचे खाजगी फोटो शेअर करायला प्रोत्साहित करणे. शारीरिक संबंधांसाठी आग्रह करणे. ब्लॅकमेलिंग करणे. अशी अनेक उदाहरणे बघायला मिळत आहेत. त्यातून या सापळ्यात अडकलेली मुलगी आणि तिचे कुटुंबीय यांना डिप्रेशन, मानसिक ताण तणाव यांचा सामना करावा लागतो.
*तरुणांतील वाढती व्यसने*… पूर्वी मुले कॉलेजच्या बाहेर पान टपरीवर सिगारेट , गुटखा यांचा वापर करताना दिसायचे. आता तितक्याच सहजतेने मुली देखील धुम्रपान, मद्यपान करताना दिसतात. बरे या पलीकडेची व्यसने सामान्य माणसाला पूर्वी माहिती नव्हती.आता weed , एमडी , गांजा अगदी मुबलकपणे शहराच्या विविध भागांत मिळतात असे कॉलेजची मूलं सांगतात. मूले आणि मूली दोघांनकडून या अंमली पदार्थांचे सेवन केले जाते.
या सर्व व्यसनांतून दैनंदिन जीवनात अभ्यासावर परिणाम, तात्पुरती प्रेमप्रकरणे, असुरक्षित शारिरीक संबंध यांचा धोका असतोच. त्याचबरोबर डिप्रेशन, सायकोसिस सारखे गंभीर मानसिक आजार होण्याचा धोका देखील लक्षणीय प्रमाणात वाढत आहे.
*बालमनाचा खेळखंडोबा* –
सोशल मिडिया आणि इंटरनेट माध्यमातून Sex / लैंगिक विषयांवरील फोटो, व्हिडिओ अगदी नकळत्या वयापासून डोळ्यासमोर येत आहेत. अमेजॉन, Netflix, इत्यादी ओटीटी माध्यमातून देखील Sex आणि हिंसाचाराचे बरबटीत प्रदर्शन रोजरोज घराघरांत चालू असते. त्यातून कमी वयात शारिरीक जवळीक, शारिरीक संबंध हे पारंपारिक मध्यमवर्गीय भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने धक्कादायक वाटणारे प्रकार वाढत आहेत. Globalization च्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण चालू आहे की काय असे वाटते. बरोबर असो की चूक पण या नवीन गोष्टी दिसत आहेत. आणि वाढत आहेत.
यांतून मोठ्या प्रमाणात वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर ताणतणाव वाढत आहे. या वास्तवास नाकारून चालणार नाही.
चकचकीत रंगीत जगातील मन आतमधून मानसिक ताणतणाव आणि उदासीनते सारखे मानसिक आजार यांच्याशी लढत आहे. त्यातून शाळकरी मुले, तरुणाई आणि आयुष्यातील उत्तरार्धात देखील आत्महत्येचे दुर्दैवी प्रयत्न वाढले आहेत…
हे सर्व कुठे तरी थांबवायला तर हवे.
*काय करावे?*
डिजीटल तंत्रज्ञान आणि उपकरणे आपल्या हितासाठी बनवली गेली. परंतु गेल्या काही वर्षांत त्याचा भस्मासुर झाला आहे. कोविड काळातील लाकडाऊनमुळे या आगीत तेल ओतले गेले. आता वेळ आली आहे गांभीर्याने विचार करत यावर नियंत्रण कसे मिळवता येईल. प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक घटकाने हे प्रयत्न करायला हवेत.
आपल्याला डिजिटल युगाचे उपभोक्ता नव्हे स्वामी व्हायचे आहे. एकमेकांशी संभाषणासाठी प्रत्यक्ष फोन आणि भेटी गाठी करा. सोशल मिडिया टाळा. पुस्तके वाचा. स्क्रीनवर वाचण्याची सवय टाळा. खेळायचे असेल तर बाहेर जाऊन खेळा. पारंपारिक बुद्धिबळ, कॅरम बैठे खेळ आहेतच.
मनोरंजनासाठी गाणी ऐका, वाचन करा, TV बघा. लहान मूल घरात असताना ॲमेझॉन, नेटफ्लिक्स वरील सिरीयल आणि चित्रपट बघताना काळजी घ्या. सेक्स, हिंसाचार, अश्लील भाषा यांचा मुलांच्या नकळत्या वयात मनावर परिणाम होणार नाही ही जबाबदारी पालकांची आहे . Sitting is the new smoking. बसणे टाळा. चालत रहा. घरातली कामे स्वतः करा. मुलांना त्यात समाविष्ट करून घ्या. गाडीचा वापर कमी करा.
काही वेळ सकाळी आणि संध्याकाळी घरातील सर्व सदस्य एकत्र राहतील असे सर्वांचे वेळापत्रक ठेवा. कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांसोबत वेळ घालवणे बोलणे ,ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दारू आणि इतर व्यसने ही मानसिक ताण कमी करण्याची, झोप येण्याची योग्य साधने नाहीत हे ध्यानात घ्या . धूम्रपान आणि अंमली पदार्थांपासून दूर रहा. मुलांशी या विषयावर मोकळे बोला. त्यांना मार्गदर्शन करा. हे विषय बोलण्यातून टाळून ते दूर राहणार नाहीत.
प्रेम प्रकरणे , त्यातून येणारे डिप्रेशन यावर देखील घरामध्ये मुक्त संवाद करा. विचार आणि भावना दडपून टाकू नका. योग्य संवाद मदत करतो .
या सर्व बाबतीत जेथे जेथे आपले प्रयत्न कमी पडत असतील तेथे मानसोपचार तज्ञांची मदत घ्या. औषधोपचार आणि समुपदेशन प्रभावीरित्या सर्व मानसिक आजारांवर मात करण्यास मदत करतात. मानसिक आजार आणि त्यावरील औषध उपचार याबद्दलचे गैरसमज दूर करा. विज्ञानाच्या अथक संशोधनाचे फलित म्हणून आज अनेक प्रभावी आणि सुरक्षित औषधे आपल्याकडे उपलब्ध आहेत. काॅग्नेटीव बिहेवियर थेरपी, रॅशनल इमोटीव बिहेवियर थेरेपी अशा जागतिक मान्यता प्राप्त मानसोपचार पद्धती उपलब्ध आहेत त्यांचा आपण लाभ घ्यायला हवा.
21 वे शतक मानसिक आजार मोठ्या प्रमाणात घेऊन आले आहे. त्यांकडे दुर्लक्ष करणे ही मोठी घोडचूक ठरेल.
तंत्रज्ञान हे हल्ली जेवणानंतरच्या आईस्क्रीम सारखे नाही राहिले . ते भाजी पोळी सारखे झाले आहे. आपण त्याला टाळू शकत नाही. तो आपल्या जीवनाचा नियमित भाग असणार आहे. रशियामध्ये किंवा युरोपमध्ये शिकणारे विद्यार्थी, दुबईमध्ये नोकरी करत असलेले व्यावसायिक या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज आमच्याशी संपर्क साधतात. आणि उपचार घेऊ शकतात. तसे यातून चांगले काय ते आपल्याला निवडता आले पाहिजे.
आपल्या जीवनातील कोणतही समस्या असो, शारीरिक आजार असो किंवा मानसिक आजार – जितके लवकर आपण सुयोग्य मार्गाने त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करू तितक्या प्रभावीपणे आणि वेळीच आपण त्यांवर मात करू शकतो हे सूत्र लक्षात घ्या.
भविष्य काय?
ज्याप्रकारे डिजिटलीकरण, धावपळीचे आयुष्य, व्यावसायिक यशामागे पळणे, व्यसने, अनियमित दिनचर्या गेल्या काही काळात फोफावले आहेत
हे असेच चालू राहिले तर मानसिक आजार ज्या वेगाने वाढत आहेत ते अधिकच वेगाने वाढत राहतील. बऱ्याचदा इतर शारीरिक आजारांप्रमाणे जीवघेणे नसले तरी आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक, आर्थिक आणि सामाजिक जीवनावर मोठे दुष्परिणाम करण्याची क्षमता ते ठेवतात. मला वाटते आपल्यापैकी कोणालाही हे नको आहे. भौतिक सुखाबरोबरच आनंद, आरोग्य, समाधान आपल्याला हवे आहे.
सुदैवाने मानवी मनामध्ये इतकी ताकद आहे की ते येणाऱ्या कोणत्याही समस्येवर मात करू शकते. इतिहासात आपण अशी अनेक उदाहरणे बघितली आहेत. कोविड संक्रमण हे सर्वात ताजे उदाहरण.
त्यामुळे हा विषय आपण योग्य प्रकारे समजून घेतला तर यातून नवीन उभारी घेत आपण संतुलित यशस्वी निरोगी आयुष्य जगू शकतो आणि हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. आपण ह्या २१व्या शतकातील वेगवान घडामोडींचे गुलाम नाहीतर गाडीवान आहोत. गाडी कशी चालवायची आपण निश्चित करू शकतो. आपल्या प्रयत्नांनी मानसिक ताणतणाव दैनंदिन जीवनातून मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो आणि त्याद्वारे मानसिक आजार स्वतःपासून जास्तीत जास्त दूर ठेवू शकतो. तसेच मानसिक आजार आणि मानसोपचार याबाबत शास्त्रीय ज्ञान जोपासत, गैरसमज दूर करत मानसोपचार तज्ञांच्या मदतीने आपण मानसिक आजारांवर यशस्वी रित्या मात करू शकतो. सुखी माणसाचा सदरा म्हणजे अजून काय असू शकते? कदाचित हाच असू शकेल आपल्यासाठी तो मिळवण्याचा मार्ग!
ReplyForward
|