दोडीतील म्हाळोबा यात्रेला आजपासून सुरुवात

रविवारी भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता; बोकडबळीचा उच्चांक अपेक्षित

सिन्नर : प्रतिनिधी
राज्यातील धनगर समाजाचे आराध्य दैवत व जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सवाला शुक्रवार(दि. 30)पासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. मंगळवारपर्यंत चालणार्‍या या यात्रोत्सवात विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बोकडबळींसाठी प्रसिद्ध असलेल्या दोडी येथील श्री म्हाळोबा महाराज व वडांगळी येथील सतीमाता – सामतदादा या यात्रा राज्यभरात प्रसिद्ध असून, दोन्ही यात्रा एकाच कालावधीत पार पडत आहेत. यात्रोत्सव सुरळीत व शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी बैठका घेण्यात आल्या आहेत. वडांगळी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी देवस्थान, ग्रामपंचायत व विविध विभागांच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. तर दोडी येथील यात्रेसाठी वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी देवस्थान विश्वस्त, ग्रामपंचायत व संबंधित विभागांच्या अधिकारी-कर्मचार्‍यांची बैठक घेत आवश्यक सूचना दिल्या.
शनिवारी देवता पूजनाने यात्रोत्सवाला सुरुवात होणार असून, यात्रेच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी (दि. 31) कावड मिरवणूक होणार आहे. या दिवशी स्थानिक मानकरी यांच्या हस्ते देवास बोकडबळी देऊन मांसाचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने यात्रेचा मुख्य व गर्दीचा दिवस ठरणार असून, राज्यभरातून लाखो भाविक म्हाळोबा महाराजांच्या दर्शनासाठी दाखल होणार आहेत. नवसपूर्तीसाठी याच दिवशी बोकडबळींची संख्या सर्वाधिक राहणार आहे. सोमवारी (दि. 1) यात्रेत गावकर्‍यांचा मोठा सहभाग राहणार असून, याच दिवशी कुस्त्यांच्या भव्य दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. 2) यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. यात्रा कालावधीत मंदिर परिसरात विविध पारंपरिक धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. यात्रोत्सवासाठी जिल्हा वाहतूक पोलीस शाखा व पोलीस मुख्यालयातील 4 अधिकारी व 25 अंमलदारांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वावी पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी व 15 अंमलदारदेखील बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

Mhaloba Yatra in Dodi begins today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *