अल्पवयीन मुलीचा विनयभंग

दोघांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीला शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून दोघा संशयितांविरोधात हरसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन बोराडे व गणेश भोर (रा. पिंपळगाव खांब, ता. जि. नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, ही मुलगी नातेवाइकाकडे वर्षभरापासून राहते. वास्तव्यास असलेल्या ठिकाणी यापूर्वी हॉटेल होते. दरम्यान, महिन्यापूर्वी संशयितांनी दरवाजा वाजवत मालकाचे नाव घेत ते कोठे आहेत, असे विचारात दरवाजाला लाथा मारून निघून गेले होते. मुलीने तिच्या नातेवाइकास हा प्रकार सांगितला. मात्र, संशयिताचे नाव, गाव माहीत नसल्याने युवतीने त्याबाबत तक्रार दिली नाही. त्यानंतर मात्र शुक्रवारी रात्री दहा ते अकराच्या सुमारास ही अल्पवयीन मुलगी घरात असताना दरवाजावर लाथा मारून संशयितांनी पुन्हा शिवीगाळ केली. यावेळी मुलीने खिडकीतून बघितले असता मागच्या वेळी ज्यांनी दरवाजावर लाथा मारल्या तेच संशयित तिला दिसले. यावेळी एका संशयिताने खिडकीची काच फोडत घराच्या दरवाजाला लाथ मारून कडी तोडली. घराचा दरवाजा तुटल्याने मुलगी बाहेर पळाली. त्यावेळी एका संशयिताने तिचे केस पकडून मारहाण केली. तर दुसर्‍याने मनास लज्जा होईल, असे कृत्य केले. यावेळी मुलीने आरडाओरड केली असता, हॉटेलमधील चेतन पवार, दिलीप खाडे, चंदर मोंढे, रामा मोंढे धावत आले. त्यांना बघून दोघे संशयित पळाले. मात्र, यावेळी उपस्थित चंदर मोंढे याने दोघा संशयितांना ओळखले. ते पिंपळखांब येथील असून, त्यांची नावे सचिन बोराडे व गणेश भोर असल्याचे समजले. याप्रकरणी मुलीने दोघांविरोधात हरसूल पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *