अंदमानही व्यापला; 7 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता
पुणे : यंदा मॉन्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात दाखल होत गुरुवारी (दि. 15) तो अरबी समुद्रात दाखल झाला आहे. अरबी समुद्रासोबतच मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकला आहे. मॉन्सून 27 मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज असून, महाराष्ट्रात साधारण 7 जूनपर्यंत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नैर्ऋत्य मॉन्सून काल अरबी समुद्र, मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात पुढे सरकला आहे. त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवसांत मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वार्यासह 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वार्यासह 50-60 किमी प्रतितास वेगाने मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे परिसरात गुरुवार (दि. 15) ते रविवार(दि. 18)पर्यंत मेघगर्जनेसह वादळी वार्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा वगळता राज्यामधील इतर जिल्ह्यांमध्येदेखील पावसाचा इशारा दिला आहे.
कोकण व लगतच्या भागांमध्ये हवेच्या वरच्या पट्ट्यात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने पुणे शहराला पुढील चार दिवस यलो अलर्ट दिला असून, पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यताही वर्तविली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनपूर्व हवामानातील बदल, चक्रीय स्थिती आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे शहरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वार्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्याला यलो अलर्ट दिला आहे. तसेच विदर्भात पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
साक्री तालुक्यात अवकाळीचे थैमान
साक्री तालुक्यात बुधवारी (दि. 15) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाचा विविध ठिकाणी फटका बसला आहे.
सोसाट्याच्या वार्यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, नुकसान झाले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत होते.
तर पारनेर तालुक्यातील सुपा येथे दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली.