अंदमानात मॉन्सून यंदा चार दिवस आधीच

नाशिक : प्रतिनिधी
मोसमी वारे अंदमान व निकोबार बेटावर लवकरच तर केरळात नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच म्हणजेच 27 मे रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.त्यामुळे यंदा मोसमी पावसाचा प्रवास लवकरच सुरू होण्याची चिन्हे असून, शेतकऱयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
साधारणपणे मॉन्सून अंदमानात 18 ते 20 मे दरम्यान, केरळात 31 मेच्या आसपास, तळकोकणात 7 जूनला,आणि उर्वरित महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत, तर देशभरात 15 जुलैपर्यंत सक्रिय होत असतो. मात्र, यंदाची मान्सूनने लवकरच वर्दी दिल्याचे दिसत आहे.तीन ते चार दिवसात तो अंदमान,ि नकोबार बेटासह अंदमान समुद्राचा परिसर व्यापण्याची शक्यता आहे.
मोसमी पावसाकरिता स्थिती अनुकूल असल्याने त्याचा पुढचा प्रवास झपाटयाने होण्याची चिन्हे आहेत.सन 2009 मध्ये मान्सून लवकरच म्हणजे 23 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता.
यंदा 27 मे रोजी केरळच्या किनार्‍यावर तो लवकरच सक्रिय झाला,तर मागच्या 15 वर्षांतील मॉन्सूनची हा गतिमान प्रवास असेल. त्यानंतरही मॉन्सूनची वाटचाल सुरूच राहणार असून, महाराष्ट्रातही तो नियोजित वेळेआधी येण्याची लक्षणे आहेत. साधारण 8 जुलैपर्यंत मॉन्सून संपूर्ण देश व्यापेल, असा अंदाज आहे.

मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांत पाऊस होत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळत आहे. आता मोसमी पाऊसही लवकरच दाखल होत असल्याने शेतकर्‍यांंसह सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कृषिप्रधान देश असलेल्या भारतात मान्सूनला महत्त्व आहे. शेती, सिंचनासह देशातील जलव्यवस्थापन प्रामुख्याने मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. मागच्या काही वर्षांत देशातील पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. यंदा हवामान विभागाने जून ते सप्टेंबर या हंगामात 105 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर यावर्षी एल निनोचा धोका नसल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

महाराष्ट्रातही चांगल्या पावसाची शक्यता

मागील पाच वर्षांत तीन वेळा मॉन्सून उशिरा आणि दोन वेळा वेळेआधी केरळमध्ये दाखल झाला आहे. यंदाही सरासरी वेळेच्या जवळपास एक आठवडा आधी मॉन्सून देशात दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. हवामान विभागाने यंदा 105 टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. यात पाच टक्के कमी किंवा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतभर चांगल्या पावसाचे संकेत आहेत.विशेषत: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या चांगल्या पावसामुळे शेतकर्‍यांंना फायदा होईल आणि त्यांची पिके चांगली होण्याची आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *