मॉन्सून दोन दिवसांत केरळात दाखल

राज्यात सात दिवसांत दाखल
नवी दिल्ली ः महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पावसाने थैमान घातले असताना अरबी समुद्रात रेंगाळलेल्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मॉन्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मॉन्सूनची अशीच प्रगती सुरू राहिली तर 1 जूनपर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. साधारण मॉन्सून दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र, यंदा तब्बल आठ दिवस आधीच दाखल होणार आहे. सध्या राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली असून, शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. आणखी काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासंबंधी अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच पुढील 2-3 दिवसांत मॉन्सून दक्षिण अरबी समुद्रात आणखी प्रगती करेल. मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भागही व्यापेल आणि लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडू आणि ईशान्यकडील राज्यांमधील काही भागांत धडक देईल.
केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्यानंतर सात दिवसांत महाराष्ट्रात म्हणजे कोकणात दाखल होतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *