मोटारसायकल अपघातात मनमाडला पिता-पुत्राचा मृत्यू

चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेले

मनमाड : प्रतिनिधी

अंतापूर-ताहाराबादवरून देवदर्शन करून परतणार्‍या पिता-पुत्रावर काळाने घाला घातला. तर पुतण्या गंभीर झाल्याची घटना गुरुवारी (दि. 15)पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास मनमाड येथे घडली.
येवला तालुक्यातील नगरसूल येथील वडाचा मळा परिसरातील किशोर ओंकार सोनवणे (40), त्यांचा मुलगा ऋतिक सोनवणे (11) व पुतण्या रवींद्र बाळू सोनवणे (27) हे पल्सर मोटारसायकलवर अंतापूर-ताहाराबाद येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परतत असताना मनमाड येथे बाजार समितीच्यासमोर पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास मागून येणार्‍या पिकअप गाडीने पल्सरला धडक दिली. धडक इतकी भयंकर होती की, यात किशोर सोनवणे व त्यांचा मुलगा ऋतिक यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा पुतण्या रवींद्र गंभीर जखमी झाला. घटनेनंतर पिकअप गाडीने मोटारसायकल जवळपास चार किलोमीटरपर्यंत ओढत नेली. मालेगाव चौफुलीवरील वाहतूक पोलिसांनी या गाडीचा पिच्छा करत गाडी पकडली. मात्र, चालक फरार झाला. या घटनेचा मनमाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *