महिला पर्यटन उद्योजिका साठी एमटीडीसी चे धोरण

पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी आई पर्यटन धोरण
पंधरा लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणार
नाशिक : प्रतिनिधी
पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या हेतूने शासनाच्या पर्यटन विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी आई महिला केंद्रीत पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने / सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे.
या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन प्रकल्पांना जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कम वरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकानुसार पर्यटन संचालनायाकडून केला जाईल. पर्यटन स्थळांच्या परिसरातील महिला पर्यटन उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल.
पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले 41 प्रकारचे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभाग महिलांना 15 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. कॅरॅव्हॅन, साहसी पर्यटन (जमीन, हवा, जल) पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, बी अ‍ॅण्ड बी, रिसॉर्ट, हॉटेल, मोटेल, टेंट, ट्री हाउस, हॉटेल, व्होकेशनल हाउस, पर्यटन व्हिला, वूडन कॉटेजेस, महिला चलित कॉमन किचन, टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स ऑपरेटर, मेडिकल टुरिझम व इतर पर्यटन व्यवसाय इ. 41 प्रकारच्या पर्यटन व्यवसायांचा यामध्ये समावेश आहे.
महिला उद्योजकांना पर्यटन व्यवसायाकरिता बँकेने रू. 15 लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या महिलेने वेळेत कर्जाचा हप्ता भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (12टक्कयाच्या मर्यादेत) कर्ज परतफेड किंवा 7वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम रू. 4.50 लक्ष मर्यादेपर्यंत जे आधी घडेल तो पर्यंत व्याजाचा परतावा पर्यटन संचालनालय व्याज परतावा अटींच्या अधीन राहून अदा करेल.या आहेत अटी:
पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे.
पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेला असला पाहिजे
महिलांच्या मालकीच्या हॉटेल / रेस्टॉरंट्समध्ये 50% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला आवश्यक. महिलांच्या मालकीच्या दूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये 50 टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.
पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात.
कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजे.नांवनोंदणी –
महिला अर्जदारांनी विहीत नमुन्यात पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे, ऑनलाईन अर्जाचे शुल्क रू. 50/- असणार आहे. सध्या ऑफलाईन अर्ज पर्यटन संचालनालयाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक नाशिक कार्यालयात संपर्क साधण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *