अक्षय शिंपी, देवा झिंजाड, नामदेव कोळी यांचा सन्मान
नाशिक : प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने नवोदित कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहाला देण्यात येणारा 2021 या वर्षासाठी विशाखा काव्य पुरस्कार अक्षय शिंपी, देवा झिंजाड आणि नामदेव कोळी यांना जाहीर झाला आहे. ही माहिती कुसुमाग्रज अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी दिली. या पुरस्कारासाठी निर्धारित मुदतीत प्राप्त झालेल्या कवितासंग्रहांची प्राथमिक निवड समितीद्वारे छाननी करण्यात आली. प्राथमिक समितीने निवडलेल्या निवडक काव्यसंग्रहांचे परीक्षण अंतिम निवड समितीने केले.
या समितीमध्ये डॉ. अभिजित देशपांडे, डॉ. श्यामल बनसोड, नितीन भरत वाघ, रामचंद्र कांळुखे, प्रवीण दामले, श्रीमती विशाखा डावखर यांचा समावेश होता. अक्षय शिंपी यांच्या बिनचेहर्याचे भिन्न तुकडे या संग्रहाला प्रथम क्रमांक, देवा झिंजाड यांच्या सगळ उलथवून टाकलं पाहिजेफ या काव्य संग्रहाला व्दितीय, तर नामदेव कोळी यांच्या काळोखाच्या कविता या संग्रहाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या कवींचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, कुलसचिव भटूप्रसाद पाटील, विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. जयदीप निकम यांनी अभिनंदन केले आहे.