मुळशी पॅटर्नची पुनरावृत्ती, कुठे घडली घटना?

गावातीलच १४ तरुणांनी वाजवला ‘गेम’, ४ जण अटकेत
सिन्नर‌ : प्रतिनिधी
तडीपार असलेला सराईत गुंड भैय्या उर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर (२७) रा. शहा ता. सिन्नर याची गावातीलच १४ जणांच्या टोळक्याने घरात घुसून बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना शनिवारी (दि.२६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. मुळशी पॅटर्न सारखी ही घटना असून, कांदळकर याचा शेवट अतिशय भयानक झाला, त्याच्यावर तब्बल 19 गुन्हे दाखल होते.
याप्रकरणी १४ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत वावी पोलिसांनी याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, शवविच्छेदनासाठी कांदळकर याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार होता.
भैय्या ऊर्फ प्रवीण कांदळकर हा दोन वर्षाच्या तडीपारीची शिक्षा भोगून घरी आला होता. शहा गावातीलच गोराणे नामक कुटुंबीयांशी त्याचे भैरवनाथाच्या यात्रेत वाद झाले होते. तेव्हापासून दोन्ही गटात एकमेंकावर कुरघोडी करण्याचे काम सुरू होते. शनिवारी सकाळी सौरभ गोराणे, दिनेश वाळीबा गोराणे, वाळीबा गोराणे, शरद दिंगबर गोराणे, विजय दिंगबर गोराणे, सचिन गोरख बागल, राहुल गोरख बागल, अतुल अशोक गोराणे, आबा गोटीराम गोराणे, रविंद्र गोटीराम गोराणे, वैभव विलास गोराणे, दगु साप्ते (पाहुणा अस्तगावकर), गणेश सोनवणे, सर्जेराव रघुनाथ गोराणे सर्वजण रा. शहा ता. सिन्नर जि. नाशिक हे हातात कोयता, कु-हाडी, लोखंडी रॉड, लाकडी दांडे घेवुन त्याच्या घरात शिरले. त्यांनी सर्वांनी एकत्रित भैया कांदळकरला जबरी मारहाण केली. त्यानंतर त्याला बाहेर ओढून आणत अंगणात टाकून देत पळ काढला. दरम्यान, जखमी अवस्थेत भैया कांदळकर याला त्याचे वडील आणि चुलत भावाने तातडीने प्रारंभी वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *