वस्त्रांतरगृह पाडकाम करणार्‍या ठेकेदाराला मनपाची नोटीस

उर्वरित कामासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना

नाशिक : प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी रामकुंड येथील वस्त्रांंतरगृह जमीनदोस्त करत असताना वस्त्रांतरगृह इमारतीचा काही भाग दत्त मंदिरावर पडल्याची घटना घडली होती. यानंतर मोठा गदारोळ याठिकाणी झाला होता. दरम्यान याप्रकरणी पाडकाम करणार्‍या स्कायवे ठेकेदाराला महापालिकेच्या बांधकाम विभागाने नोटीस काढली आहे. रात्रीच्यावेळी काम केल्याने सदर घटना घडली होती. तसेच यापुढे असा प्रकार होणार नाही याकरिता उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत.

केंद्र शासनाकडून पंचवटीत रामकाल पथ आध्यात्मिक कॉरिडॉर साकारला जातो आहे. त्यासाठी वस्त्रांतरगृहासह काही दुकाने हटवली जाणार आहेत. काही वाडेही जमीनदोस्त केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 27 कोटींची तर दुसर्‍या टप्प्यात 72 कोटींहून अधिकची निविदा काढली आहे. केद्र शासनाकडून रामकाल पथ प्रकल्पास 99 कोटी दिले जाणार असून राज्य शासन 45 कोटींची मदत करणार आहे. सदर प्रकल्पाचे काम सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी मार्गी लावण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. दरम्यान, दुसर्‍या टप्प्यातील काम अद्याप सुरू झालेले नाही. वस्त्रांतरगृह पाडून तेथे घाट उभारला जाणार आहे. याशिवाय सध्याजे घाट आहेत आणि ते रामकाल पथ प्रकल्पात येतात त्यांचीही दुरुस्ती केली जाणार असल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी म्हटले आहे. साधारणत: वर्षभराचा कालावधी संपूर्ण रामकाल पथसाठी लागण्याचा अंदाज आहे. गुजरातमधील एचसीपी या सल्लागार संस्थेला आराखडा तयार करण्याचे काम दिले आहे. सदर कंपनीच्या प्रतिनिधीच्या सूचनेनुसार रामकाल पथ साकारला जाणार आहे.

पावसामुळे थांबले होते काम

रामकुंड येथील वस्त्रांतरगृह हटवण्याचे काम सुरू असताना काही दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस सक्रिय झाल्याने कामात अडथळे येत होते. पाऊस उघडताच कामाला सुरुवात केली जाणार आहे.

अशी घेतली जाणार खबरदारी

यापुढील वस्त्रांतरगृहाचे काम पाडताना त्याच्या बाजूलाच सिमेंटच्या गोण्या उभारल्या जाणार आहेत. याशिवाय लोखंडी जाळी लावली जाईल. जेणेकरून बांधकामाचा मलबा शेजारील मंदिरावर पडणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *