आठ वर्षांत एक लाख 56 हजार करदात्यांची नोंद
नाशिक : गोरख काळे
नाशिकमध्ये घर घेणार्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमालीची वाढली आहे. चांगलेे नैसर्गिक वातावरण, मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांसह परराज्यात जाण्यासाठी रेल्वे व थेट विमानसेवेची कनेक्टिव्हिटी असल्याने जिल्ह्यासह बाहेरील नागरिकांची पसंती नाशिकला मिळत आहे. त्यामुळेच मागील आठ वर्षांत नाशिकमध्ये तब्बल एक लाख 56 हजार नवीन मालमत्तांची नोंद महापालिकेच्या कर विभागात झाली आहे. विशेष म्हणजे, यामुळेे महापालिकेच्या उत्पन्नात 305 कोटी 49 लाखांची भर पडली आहे.
उत्तर महाराष्ट्राचे केंद्रस्थान म्हणून नाशिककडे पाहिले जाते. दर बारा वर्षांनी शहरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने त्याअनुषंगाने शहरात विकासाचा रोड मॅपच तयार होत असतो. सध्या सिंहस्थाची लगबग सुरू असून, दोन वर्षांनी नाशकात हा धर्मोत्सव होणार आहे. पाण्याच्या उपलब्धतेपासून तर शुद्ध वातावरणामुळेच नाशिकमध्ये गेल्या आठ वर्षांत दीड लाखाहून अधिक नागरिकांची नोंद करदाते म्हणून झाली आहे. सध्या महापालिकेकडे सहा लाख घरपट्टीधारकांची नोंद आहे. वर्षाला या घरपट्टीतून महापालिकेला अडीचशे कोटीहून अधिक महसूल घरपट्टीतून मिळतो. शहरात 2018-19 वर्षानंतर नवीन मालमत्ताधारकांची संख्या वाढताना दिसत
आहे.
दरम्यान, महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोेत घरपट्टी व पाणीपट्टी आहे. या करातून मिळणार्या रकमेतून महापालिका विकासाची कामे करते. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात हजारो कोटींची कामे होणार असून, जिल्ह्याातील नागरिकांकडून नोकरी, शिक्षणासाठी नाशिक चॉइस ठरत आहे. भविष्यात मालमत्तेच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा विचार करून अनेक जण घरांमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत.
नाशिकमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाची मोठी क्षमता आहे, ज्यामुळे गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. नवीन नोकरीच्या संधीदेखील आहेत. विशेषत: सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतींसह प्रगत शेती आणि सिंहस्थनगरीचा बहुमान अशा विशेष बाबी नागरिकांना आकर्षित करतात.
इतर शहरांच्या तुलनेत नाशिकमधील राहणीमानाचा खर्च कमी असल्याने आर्थिकदृष्ट्या अनेकांना परवडणारे आहे. याशिवाय नाशिक महाराष्ट्रातील एक प्रमुख आर्थिक केंद्र बनले आहे. म्हणूनच येेथे स्थायिक होण्याचे प्रमाण गतवर्षात वाढत आहे.
आठ वर्षांतील आकडेवारी याप्रमाणे
वर्ष नव्या मालमत्तांची संख्या उत्पन्नवाढ
2018-19 1,934 10 कोटी 49 लाख
2019-20 11,453 26 कोटी 56 लाख
2020-21 14,909 23 कोटी 50 लाख
2021-22 24,718 39 कोटी 80 लाख
2022-23 22,166 45 कोटी 18 लाख
2023-24 37,984 66 कोटी 48 लाख
2024-25 27,624 61 कोटी 51 लाख
2025-26 15,714 32 कोटी 3 लाख
एकूण 1,56,502 305 कोटी 55 लाख
जीआयएस सर्वेक्षणानंंतर वाढ
महापालिका प्रशासनातर्फे 2017 साली जीआयएस ऑनलाइन प्रणाली राबवत मालमत्तांची माहिती घेण्यात आली. त्यावेळी शहरातील अनेकांच्या मालमत्तांची नोंद न होता तशाच पडून होत्या. पुढे मात्र त्यांची नोंद महापालिका दप्तरी करण्यात आली.
नवीन मालमत्ता खरेदी झाल्यानंतर त्याची नोंद महापालिकेच्या कर विभागात होते. गत आठ वर्षांत वरीलप्रमाणे नवीन मालमत्तांची नोंदणी झाली असून, एकूण मागणी रकमेपैकी पन्नास टक्क्यांचा भरणाही संबंधितांनी केला आहे.
-अजित निकत, उपायुक्त, कर विभाग, मनपा