‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी मनपाचे चोख नियोजन

आयुक्त, महापौरांच्या उपस्थितीत पदाधिकार्‍यांची बैठक

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीद समागम वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या ‘हिंद दी चादर’ या विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने नाशिक शहरातील सर्व गुरुद्वारांच्या पदाधिकार्‍यांची नियोजन बैठक बुधवारी (दि.25) मनपा आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर आदी उपस्थित होते. बैठकीत ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक गुरुमितसिंग बग्गा, अमृतपाल सिंग, रणजीत सिंग आनंद, सुमित बग्गा, बलजीत सिंग सिब्बल, गुरविंदर सिंग, तेजिंदर सिंग, गुरमित सिंग हंडल, सुरेंद्र सिंग सालिया, गुरू अवतार सिंग सिंधू तसेच शहरातील शीख संप्रदायातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी होणार्‍या ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी नाशिक शहरातून मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी होणार असल्याने त्यांच्या वाहतूक व्यवस्थेची आणि भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा, आवश्यक साधनसामग्री उपलब्धता, तसेच समन्वय याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासन व नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी यावेळी दिली.उपमहापौर विलास शिंदे यांनी बैठकीस शहरातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले व नाशिकमधून हिंद दी चादर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. गुरू तेज बहादूर हे शीख धर्मातील नववे गुरू असून, त्यांना हिंद दी चादर (धर्मरक्षक) म्हणून ओळखले जाते. धार्मिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी त्यांनी अपार त्याग केला. इ.स. 1675 मध्ये दिल्ली येथे धर्मस्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान भारतीय इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी घटना मानली जाते. त्यांच्या शौर्य, त्याग आणि सर्वधर्मसमभावाच्या संदेशामुळे ते संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. धार्मिक सहिष्णुता, मानवता आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरू तेज बहादूर यांच्या कार्याचा जागर आणि त्यांच्या बलिदानातून मिळणार्‍या प्रेरणेचा प्रसार करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *