शहरात आजही येणार कमी दाबाने पाणी
नाशिक : प्रतिनिधी
शहरात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाइपलाइन दुरुस्तीचे काम रविवारी हाती घेतले होते. मात्र, यामुळे नागरिकांचे हाल झाल्याचे दिसून आले. दरम्यान, सोमवारीदेखील सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याने नागरिकांना पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे.
महानगरपालिका हद्दीतील सातपूर विभागात 1200 मि.मी. व्यासाच्या कच्च्या पाण्याच्या मुख्य पाइपलाइनला मोठ्या प्रमाणात गळती थांबविण्याचे काम रविवारी (दि. 4) उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे शहराच्या सर्वच भागात पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. गंगापूर डॅमवरील पंपिंगच बंद असल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी घरगुती वापरासाठी पाण्याची मोठी गरज असते. मात्र, याच वेळेत पाणी उपलब्ध नसल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुक्त विद्यापीठ गेट परिसरात ही गळती थांबविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरात रविवारी तर पाणी आलेच नाही, परंतु सोमवारी (दि. 5) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती मनपाकडून मिळाली आहे. 1200 मि.मी. व्यासाच्या कच्च्या पाण्याची मुख्य पाइपलाइनद्वारे नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड तसेच सिडकोतील काही भागांना पाणीपुरवठा होतो. या कामामुळे सोमवारी दुपारचा पाणीपुरवठा नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, नाशिकरोड व सिडकोतील पवननगर जलकुंभावरून वितरण होणार्या भागात बंद राहणार आहे.
अत्यावश्यक व तातडीची दुरुस्ती नागरिकांच्या हितासाठी करण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून मनपाला सहकार्य करावे. मुक्त विद्यापीठ परिसरात जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. कामास उशीर लागू शकतो.
-रवींद्र धारणकर,अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा
Municipal Corporation’s repair work: Citizens’ plight without water