मनपाची प्रभागरचना शुक्रवारी प्रसिद्ध होणार

हरकतींवरील सूचनांसाठीच्या कालावधीत मुदतवाढ

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार करण्याचे काम सुरू होते. प्रभागरचना तयार करुन मनपा प्रशासनाने राज्याच्या नगरविकास विभागाला सादर केला असता नगरविकास खात्याने 11 ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाला प्रभागरचना सादर केला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि.22) ते 4 सप्टेंबरदरम्यान प्रभागरचना प्रसिद्ध करून आलेल्या हरकतींवर सूचना मागवण्यात येणार आहेत.
दरम्यान यापूर्वी निवडणूक आयोगाने 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान प्रभागरचना प्रसिद्ध व हरकतीसाठीचा कालावधी दिला होता. परंतु या सहा दिवसांत दोन ते तीन दिवस सुट्यांत जात असल्याने कामांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने त्यात आणखी सहा दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला. 11 जून पासून प्रभार रचनेचे कामकाज महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप प्रभागरचना तयार करण्याचे काम सुरू होते. 31 जुलैपयर्ंत प्रभाग रचनेवर काम करून नगरविकास विभागाला प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला. अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासाठी चार दिवस राहिले आहेत.
आतापयर्ंत प्रशासनाने प्रगणक गटाची मांडणी, स्थळ पाहणी, गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करुन नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागाच्या हद्दी प्रत्यक्षात जागेवर जाऊन तपासल्या गेल्या. त्यानंअर प्रभाग रचना आणि सीमा निश्चितीचे काम केले गेले.
या प्रक्रियेत प्रभागांची लोकसंख्या, भौगोलिक स्थिती, आणि इतर निकषांवर विचार करून सीमा निश्चित केल्या. प्रभागरचना करताना, ज्या ठिकाणी कमी-अधिक लोकसंख्या आहे. त्याची कारणे प्रस्तावात नमूद केली आहेत.प्रभागांची रचना योग्य आणि न्यायपूर्ण पद्धतीने व्हावी. जेणेकरून नागरिकांचा निवडणुकीतील सहभाग सहज आणि प्रभावीपणे होईल. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम राज्य शासनाच्या सुधारित वेळापत्रकानुसार 11 जून 2025 पासून सुरू झाले आहे. प्रभागरचना तयार करताना 2011 च्या जनगणनेची माहिती आणि प्रगणक गटांचे तपशील आधार म्हणून वापरले जाणार आहेत. प्रभागातील सीमा हद्दची तपासणी करताना प्रभागांच्या संभाव्य हद्दी आणि त्यांचे भौगोलिक वितरण यांचा विचार करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या अधिकार्‍याकडून प्रभाग रचनेस मान्यता दिल्यावर प्रभाग रचनेची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लागले लक्ष

शुक्रवार (दि. 22) ते 4 सप्टेंबरदरम्यान प्रभागरचना प्रसिद्ध होणार असल्याने प्रभाग रचना कशी असणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. ठाकरे व मनसेच्या पदाधिकार्‍यांनी तर प्रभागाची मोडतोड करण्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे प्रभागरचना कशी असणार, याची उत्सुकता राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लागली आहे.

5 सप्टेंबरपासून हरकतींवर सुनावणी

प्रभागरचना प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर हरकती मागवल्या जाणार आहेत. त्यानुसार आलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी 5 सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात येईल. सदर सुनावणी 12 सप्टेंबरपर्यंत घेतली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *