ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे मनपा व पोलीस विभाग होणार स्मार्ट…

नाशिक प्रतिनिधी

 

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत माननीय केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे इम्प्लिमेंटेशन अँड मेन्टेनन्स ऑफ इंटिग्रेटेड सर्व्हेलन्स अँड सिटी ऑपरेशन्स प्लॅटफॉर्म (ISCOP) फॉर इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (EOC) या प्रकल्पा अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून शहरावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. या उपक्रमामध्ये नाशिक स्मार्ट सिटी च्या वतीने दोन कॅमेऱ्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये महानगरपालिकेच्या अग्निशामक दलातील कर्मचारी व पोलिसांचा समावेश होता. प्रशिक्षणार्थीना ड्रोन कशा पद्धतीने वापरायचा त्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले पाहिजे, ड्रोन वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे याची संपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली. त्याचबरोबर सर्व प्रशिक्षणार्थीची परीक्षा घेऊन त्यांना ड्रोन वापरण्याचा परवाना प्रदान करण्यात आला.

ड्रोनच्या माध्यमातून पूर परिस्थितीचे निरीक्षण, आगामी काळात कुंभमेळ्याचे क्राउड मॉनिटरिंग, विविध ठिकाणांचे अचूक मॅपिंग तसेच आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. यासोबतच या प्रकल्पांतर्गत नाशिक शहरात 200 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका व तसेच सहा विभागीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यात येणार आहे. सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने स्मार्ट सिटीच्या वतीने २ ड्रोन कॅमेरे महानगरपालिका व २ ड्रोन कॅमेरे पोलीस विभागाला देण्यात येणार आहेत. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुमंत मोरे तसेच आयटी विभागाचे महाव्यवस्थापक  अनिल तडकोड, उपमहाव्यवस्थापक सुधीर गोराडे आणि ड्रोन कॅमेऱ्यांचे प्रशिक्षण घेणारे सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *