नाशिकमधील खुनाचे सत्र थांबेना
सिडको : वार्ताहर
अंबड लिंक रस्त्यावरील संजीव नगर भागात मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने १९ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेत आलम शब्बीर शेख (रा.बिहार) हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला. रात्री १२ वाजेच्या दरम्यान उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. संजीवनगर भागात यात्रा सुरु आहे. याच परिसरात मागील बाजूच्या मोकळ्या मैदानातुन आलम जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याला अडवून धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला आलम रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, नंदन बगाडे व गस्ती पथकाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी जखमी आलमला उपचारासाठी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रात्री १२ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्यामागचे कारण शोधले जात आहे. पोलिसांकडून हल्लेखोर खुन्याचा शोध घेतला जात आहे.