धृवनगर भागातील खळबळजनक घटना
सातपूर: प्रतिनिधी
आईला बेशुद्ध करुन तीन महिन्याच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील धृवनगर परिसरात घडली. या घटनेने नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धृवांशी भूषण रोकडे वय ३ महिने, असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर सातपूर लिंक रोड येथील धृव नगर परिसरात भूषण रोकडे हे आपली पत्नी, आई आणि ३ महिन्याची चिमुकली धृवांशी यांच्यासमवेत राहतात. भूषण हे सातपूर येथील एका कंपनीत सुपरवायझर आहेत.
सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामाला गेले. तेव्हा घरात त्यांच्या आई आणि पत्नी दोघीच होत्या. सायंकाळी त्यांची आई दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी भूषण यांची पत्नी आणि चिमुकली धृवांशी घरात होत्या. या गोष्टीचा फायदा घेत एक पंजाबी ड्रेस घातलेली अज्ञात महिला अचानक घरात घुसली.
या महिलेने धृवांशी हिच्या आईच्या नाकाला रूमाल लावला. आई बेशुद्ध झाल्यानंतर या क्रूर महिलेने पलंगावर झोपलेल्या तीन महिल्याच्या निरागस धृवांशीचा धारधार शस्त्राने गळा चिरला. काही वेळानंतर भूषण यांच्या आई दूध घेऊन घरी आल्या. त्यांनी आपल्या सूनेला बेशुद्ध अवस्थेत पडलेले बघितले. दुसरीकडे चिमुकली नात धृवांशी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. हा संपूर्ण प्रकार बघताच, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आरडाओरड करून या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर तातडीने धृवांशी आणि तिच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच धृवांशीचा दुर्देवी मृत्यू झाला होता.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे पथक सह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ही हत्या कुठल्या कारणातून झाली याबाबत पोलिसांनी तपस सुरू केले. मात्र मुलीच्या आईने एका महिलेवर संशय व्यक्त केला असून सोमवारी रात्री उशिरा पर्यंत पोलिस अधिकारी घटनास्थळी तपास करत होते. मुलीची आई शुद्धवीर आली असून पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
मात्र तीन महिन्याचा लहान चिमुकलीची हत्या का केली याची माहिती अजून देखील मिळालेली नाही अधिक तपास पोलीस करत आहेत