उड्डाण पुलावर चाकू हल्ला – तीन दिवसांत तीन खून
सिडको विशेष प्रतिनिधी
लघु शंका करण्याच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात उड्डाण पुलाजवळ एका ३५ वर्षीय मजुराचा चाकू हल्ल्यात खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दिनांक २६ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास वडाळा नाका येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाजवळ घडली.मयत मजुराचे नाव बंडु लक्ष्मण गांगुर्डे (वय ३५ वर्षे ) असून, तो आपल्या पत्नीबरोबर पुलाखाली वास्तव्यास होता. त जयेश दिपक रायबहादुर असे संशयित अरोपीचे नाव आहे.
घटनेदरम्यान, बंडु गांगुर्डे यांनी आरोपी जयेशला “येथे लघु शंका करू नकोस” असे सांगितले. या क्षुल्लक कारणावरून संतापून, जयेश याने बंडूवर जोरदार हल्ला केला. त्याने जवळच्या धारदार चाकूने बंडूच्या छातीवर व पोटावर वार करत गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर जयेश घटनास्थळावरून फरार झाला.जखमी बंडु याला त्याच्या पत्नीने आणि नातेवाईकांच्या मदतीने रिक्षातून तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर बंडूची पत्नी, अक्की बंडू गांगुर्डे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेत जयेशविरोधात तक्रार दाखल केली. नाशिक पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.आरोपी जयेश रायबहादुर याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत ६ गंभीर गुन्हे दाखल असून, तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पुलाजवळ राहणाऱ्या अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस निरीक्षक अतुल क्षीरसागर यांच्याखालील पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.
तीन दिवसात तीन खून
सातपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रमिक नगर येथे किरकोळ कारणावरून एका तेवीस वर्षीय कंपनी कामगाराचा दहा पंधरा जणांनी धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केला तर दुसर्या दुस-या दिवशी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील भांडणाची कुरापत काढुन एका युुवकाचा खुन झाला त्यापाठोपाठ पुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अतिशय किरकोळ कारणावरून एका मजुराचा खुन झाला आहे या तिन्ही घटनांवरून नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी फोफावल्याचे स्पष्ट होत आहे या वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आवर न घातल्यास भविष्यात सर्व सामान्यांना जीवन जगणे कठीण होणार असुन पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावावा अशी मागणी सर्व भयभीत नाशिककरांनी केली आहे