मेंढीत बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला

सिन्नर  प्रतिनिधी
तालुक्यातील मेंढी येथील शेतकरी भाऊसाहेब सयाजी गिते हे सोमवारी (दि. 29) रात्री साडेआठच्या सुमारास वडांगळी येथून काम आटोपून मोटार सायकलने घराकडे जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात गीते जखमी झाले आहेत.
वाल्मिक लक्ष्मण गीते यांच्या घराजवळील काटवनातून रस्त्याने जाणारे भाऊसाहेब गिते यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. यामध्ये भाऊसाहेब यांच्या पायावर पंजाने ओरखडले आहे. त्यांच्या मागून थडी सारोळे येथील घोटेकर नामक गृहस्थ मोटरसायकलने जात होते. त्यांनाही बिबट्या, मादी व दोन बछडे यांचे दर्शन घडले. त्यांचीही घाबरगुंडी उडाली. गीते यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. आसपासच्या नागरिकांनी लगेचच भाऊसाहेब गिते यांना वडांगळी येथे खाजगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले. दरम्यान घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास वनसंरक्षक वत्सला कांगणे, मधूकर शिंदे, टि. एल. डावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन गिते यांची विचारपूस केली. त्यांना दोडी येथील सरकारी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. मेंढी शिवारात पिंजरा लावण्यात येणार असल्याचे कांगणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *