राजं मुजरा! माझ्या जाणत्या राजा,
अगदी कालपरवाच तुझी जयंती दिमाखात साजरी झाली. 19 फेब्रुवारी ही ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार तुझी जयंती. पण वर्षभरात फेब्रुवारी महिना असतो हे राजकाजात, मोहिमांमध्ये अडकलेल्या रयतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणार्या तुला चैत्र, वैशाख याचा हिशोब जिजाऊ, तुझ्या राण्या आणि अमात्य ठेवत असताना माहीत तरी होते का? वर्षभरात जन्मदिनी पहाटे मंगलप्रसंगी जिजाऊंचे आशीर्वाद घेत राण्यांकडून ओवाळून घेत सकाळपासूनच स्वतःला राजकाजात झोकून देणार्या तुला जन्मदिवसाचे औचित्य साजरे कसे करायचे ही जाणीव होती का? कित्येक वेळा महाराजा मावळ्यांसोबत मोहिमांमध्येच तर तू गुंतलेला असायचास.
राजा तू इहलोकाचा निरोप घेतलास त्यावेळेची राजकीय परिस्थिती फक्त तुझ्या आत्म्यालाच माहिती. इतिहासकार वर्णन करतात, पण खरे खोटे फक्त तुलाच माहिती रे राजा. शंभूराजांनी दहा वर्षे गनिमांशी लढा दिला बघत होतास ना तू वरून! तुझे पित्याचे काळीज त्यांचा पराक्रम, धर्मनिष्ठा बघून सुपापेक्षाही मोठे झालेच असेल. देश अन् धर्मासाठी लढणारे मावळे तुम्ही तलवारीशी लगीन लावून तळहातावर शिर घेऊन गनिमांशी टक्कर देत होतात. सह्यकड्याच्या इतकेच भक्कम काळीज कुठल्याही संकटांनी डगमगत नव्हते की ऊन, वारा, पावसाच्या सुलतानीला भीत नव्हते. राजा तू स्वर्गलोकात गेल्यानंतर तुझा जन्माच्या नोंदी दस्तावेजातच राहिल्या. जवळजवळ दोनशे वर्षं त्या तशाच पडून होत्या.
शंभूराजे स्वर्गवासी झाल्यानंतर तू निर्माण केलेल्या साम्राज्याचे राजकारण प्रचंड विस्कळीत होते. पण इंग्रजांच्या जुलमी काळात राजा तुझी महती अधिकतम प्रमाणात समजली. आणि थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक आणि महात्मा जोतिराव फुले यांनी जनतेच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटावी म्हणून सार्वजनिकरीत्या शिवजयंती करण्याचे ठरवले. तेव्हापासून आजतागायत शिवजयंती धूमधडाक्यात साजरी होत आहे.
दरवर्षी तुझ्या शिवजयंतीचे आगळेपण बघतोच आहोत. शिवप्रेरणेने भारलेले मावळेदेखील बघतो आहोत. तेच भारावलेपण तर आयुष्यभर आमच्याही मनात आहे. पण या भारावलेपणाचा अभिमान हल्ली उद्विग्नतेकडे वाटचाल करायला लागलाय राजा! कारण म्हणशील तर असंख्य आहेत.
परवाच्या शिवजयंतीत नेहमीप्रमाणेच तुझे अश्वारूढ पुतळे, छातीपर्यंतचा अर्धपुतळा, सजवलेले भगवे स्टेज प्रत्येकी शंभर मीटर अंतरावर होते. भगवा कुर्ता, सफेद पायजमा, कमरेला भगवा शेला, डोईवर भगवे मुंडासे किंवा पगडी घालून, कपाळाला शिवगंध रेखून मावळे उत्साहात सगळीकडे फिरत होते. त्यांच्या मावळणीदेखील भगव्या रंगाची साडी किंवा सलवार-कुर्ता घालून त्याच मावळ्यांसोबत मिसळ पावच्या हॉटेलला किंवा टपरीवर चहा पीत ढोलताशांच्या गजरात नाचत फिरत होत्या. उत्साह असतो राजा! मला मान्य आहे. पण तुझ्या राज्यातल्या चुलीच्या फुंकणीसकट शेतात सपासप कोयता चालवणार्या, प्रसंगी तलवार दांडपट्ट्याचा गनिमांवर लीलया वार करणार्या या मावळणी अंगभर पदर डोईवरून ढळू न देता कृष्णा घोडीलाही दर्याखोर्यांतून त्या स्वतः किंवा फक्त त्यांच्याच धन्याच्या सोबत बसून गनिमांपासून स्वसंरक्षणासाठी पळवत होत्या. तुझ्या जन्मदिवसाच्या औक्षणाची पहाटेची मंगल वेळ हल्ली संध्याकाळच्या कातर वेळेपर्यंत कधी पोहोचली कळलेही नाही. औक्षण झाल्यावर जिजाऊंसहित रायरेश्वराला अभिषेक घालत तुळजाभवानीपुढे नतमस्तक होणारा तुझ्यासोबतच्या मावळ्याला हल्ली जवळच्या शिवराऊळाचे भान नसते की आदिशक्तीच्या मंदिराचे.
हो एक होते की, तोफांच्या आवाजाला सरावलेल्या तुझ्या कानांना हल्ली जयंतीच्या वेळी स्टेजकडे एक-एक करत येणार्या प्रमुख पाहुण्यांच्या आगमना सोबत लवंगी किंवा सुतळी फटाक्यांचे आवाज सहन करावे लागत असतील. येणारे कार्यकर्त्यांच्या गराड्यातील पाहुणे स्टेजवर चढताच कार्यकर्ते, फटाके वाजवणारे आणि समोरच्या श्रोत्यांची पांगापांग का होते? कळत नाही. सगळेच प्रमुख पाहुणे मग स्टेजवर शिळोप्याच्या गप्पा करत असतील की राजकारणाच्या; समजत नाही. फटाक्यांच्या आवाजात कळतही नाही. नेहरूशर्ट फेटे आणि इतर जामानिम्यातले हे प्रमुख पाहुणे दुसर्या दिवशी रस्त्यावरून कुत्र्यांसोबत जॉगिंगला टी-शर्ट बरमुडामध्ये ओळखूही येत नाहीत. ते कुत्र्यासोबत पळतायेत की कुत्रं त्यांच्यासोबत पळतोय, हेही कळत नाही. असो.
आम्ही शाळेत शिकल्याप्रमाणे टिळकांनी गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सार्वजनिकरीत्या करण्याचे ठरवले. महात्मा फुलेंनी त्यांची कल्पना उचलून धरत दोन्ही उत्सवामार्फत आपल्या उदात्त परंपरा, स्वातंत्र्याची महती सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांच्या कार्यात सहभाग घेतला. राजा इतकेच नव्हे, तर जोेतिरावांनी तुझी समाधी शोधत त्यावरील झुडपे, वेली यांना स्वच्छ करत तुझ्या अस्तित्वाची जाणीव रयतेला करून दिली. दोघांचेही कार्य महानच आहे. पण सोशल मीडियावर हल्ली टिळक-फुले वाद बोकाळाला आहे. त्या वेळेची सामाजिक, राजकीय परिस्थिती बघता दोघांच्याही कार्यापुढे नक्कीच नतमस्तक व्हावेसे वाटते. असेल का रे राजा तुझ्याकडे एखादी तलवार सोशल मीडियावरल्या त्या माथेफिरू लोकांच्या पोस्ट कापून फेकून देण्यासाठी? वयाच्या बाराव्या वर्षापासून मल्लखांब, कुस्तीचे डावपेच, तलवारबाजी, अश्वारोहण शिकणारा मावळा आता वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षीच कुठल्याही राजकीय सणाला बुलेट किंवा अॅक्टिवावरून कदाचित मद्यधुंद अवस्थेत ट्रिप्सी किंवा एखाद्या अर्धवट तंग कपड्यातल्या मावळणीला सोबत घेऊन पोलिसांच्या समोरून त्याच्या हातावर तुरी दिल्यासारखे किंवा कुठेतरी काहीतरी चोरी, पाप जिंकल्यासारखे तोंडातून विचित्र किंचाळल्यासारखे आवाज काढत दीड इंचाची छाती शरीरातील हाडांच्या सापळ्यातून फुगवत फिरत असतो. दूध, भाकरी, भाज्या खाऊन उत्तम शरीरसंपदा लाभलेल्या मावळ्याच्या तोंडून आयुष्यभर ’हरहर महादेव’ गर्जना ऐकणारा तू हे किंचाळणे कसे सहन करत असशील? त्या महादेवालाच माहिती. त्या काळातल्या बखरीनुसार तुला वैयक्तिकरीत्या पोवाडे, स्तुतिकवनं ऐकायला कधीच आवडत नव्हते. पण मावळ्यांच्या मनात स्वरज्याविषयी लढाऊ बाण्याची प्रेरणा सदैव जागृत राहावी म्हणून जिजाऊ रात्रीच्या वेळी पलित्यांच्या प्रकाशात ढोल, संबळ, तुणतुण्याच्या नादावर पोवाडे गाणार्यांना पाचारण करत. मावळ्यांच्या मनात गनिमांविरोधी चैतन्य स्फुरायचे, स्वातंत्र्याचे वारे अंगात शिरायचे. गनिमांना हरवण्यासाठी मनात स्फुल्लिंग निर्माण व्हायचे. हल्ली पण असतात ना पोवाडे भल्या मोठ्या अवाढव्य स्टेजवर; पियानो, सिम्फनी, व्हायोलीनसोबत मराठमोळे ढोलताशे वाजवणारेही फक्त उभे असतात. देशातला एखादा परप्रांतीय त्याच्या खड्या आवाजात पोवाडे गात गात मराठमोळी लकब त्याच्या आवाजात आणण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो. त्याची गाणी ऐकण्यासाठी होणारी गर्दी मराठी कलाकार समोर उभा राहिल्यावर का पांगते? कारण कळत नाही. ’विकतंच गाजर गोड’ या म्हणीचा प्रत्यय येतो. आकाशात होणारी आतषबाजी बघण्यासाठी लोकं माना वर करकरून बघतात. पुलावर उभे असतील तर कठड्यावरून खाली कोसळण्याची शक्यता. पोलीस बांधवांनी तरी कुठे कुठे सतर्क राहायचे? (क्रमश:)
‘My Knowing King’