लोकप्रतिनिधींची सत्ता, निधीला हिरवा कंदील
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेला केंद्राच्या राष्ट्रीय हवा स्वच्छ कार्यक्रमांतर्गत (एन-कॅप) दरवर्र्षी निधी दिला जातो. याद्वारे पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणारी कामे शहरात केली जातात. मात्र, महापालिकेला 2024-25 या वर्षातला 17 कोटींचा निधी मिळालेला नव्हता. या निधीसाठी केंद्राकडे पत्रव्यवहार केला असता, लोकप्रतिनिधींची सत्ता आल्यावरच हा निधी मिळेल, असे चार-पाच महिन्यांपूर्वी सांगण्यात आले होते. दरम्यान, आता नाशिक मनपाला 2024-25 सह 2025-26 या वर्षातलाही 17 कोटींचा निधी, असा एकूण 34 कोटींचा निधी मिळणार आहे, असेे पर्यावरण विभागाचे उपायुक्त नितीन पवार यांनी सांगितले.
महापालिकेचा एन-कॅपचा 2024-25 वर्षांतील 17 कोटींचा निधी केंद्राकडे अडकलेेला होता. हा निधी मिळावा यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाचा पत्रव्यवहार सुरू होता. केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाने एन-कॅप योजनेत देशभरातील 132 शहरांमधील प्रदूषण पातळी 30 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, या योजनेत नाशिकचाही समावेश करण्यात आलेला आहे. महापालिकेला 2022 पूर्वी चार वषार्ंत तब्बल 87 कोटींचा निधी मिळाला होता. एन-कॅप योजनेतून दुभाजक सुशोभीकरण, ग्रीनरीचे काम केले गेलेे. महापालिकेने सातपूर येथील खुल्या जागेत वृक्षलागवड, देखभाल, रस्ते व दुभाजक सुशोभीकरण, नाशिक पूर्व रस्ते दुभाजक व वाहतूक बेट सुशोभीकरण, खुल्या जागेत वृक्षलागवड, नाशिकरोड व नाशिक पश्चिम विभागातील तरण तलावांवर सोलर सिस्टिम करणे, पपया सर्कल ते एक्स्लो पॉइंट, नरसिंहनगर ते अयोध्या कॉलनी सर्कल रस्ता व दुभाजक सुशोभीकरण आदी कामे एन-कॅपमधून केल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
एन-कॅपचा निधी मिळावा यासाठी मागेच पत्रव्यवहार केला असता, मनपात लोकप्रतिनिधींची सत्ता आल्यावरच हा निधी मिळेल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार लोकप्रतिनिधींची सत्ता आली असून, नाशिक मनपाला दोन वषार्ंचा 34 कोटीचा निधी मिळणार आहे.
– नितीन पवार, उपायुक्त, पर्यावरण विभाग, मनपा
N-Cap Fund; Path of 34 crores cleared