नादच खुळा: 9 नंबर साठी पठ्ठयाने मोजले इतके लाख
पंचवटी : सुनील बुनगे
प्रादेशिक परिवहन कार्यालयात १७ एप्रिल पासून चारचाकी वाहनांसाठी नवीन (एम.एच १५ के.जी) ही मालिका सुरू झाली.या मालिकेतील १४ आकर्षक नंबरसाठी लिलाव प्रक्रिया सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास चौधरी यांच्या उपस्थितीत पार पडली.यात ९ नंबर साठी सर्वाधिक बोली लागल्याने या नंबरसाठी एका हौशी वाहन मालकाने तब्बल ४ लाख ५० हजारांची बोली लावल्याने वाहन मालकाने शासकीय शुल्कासह ७ लाख रुपयांना खरेदी केला.दरम्यान एकाच दिवसात केवळ लिलावाच्या माध्यमातून ८ लाख २२ हजार ३२२ रूपयांचा अतिरिक्त महसुलाची आरटीओच्या तिजोरीत भर पडली.
वाहन घेताना अनेक हौशी वाहन मालक आकर्षक नंबरला पसंती देतात. त्यातच गत वर्षी आकर्षक नंबरच्या शुल्कात दुपटीने वाढ झाली आहे.दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी वेगवेगळे प्रकारचे शुल्क आकारले जातात. त्यात चारचाकी वाहनांचे शुल्क जास्त आहेत. एका आकर्षक नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या नंबरसाठी लिलाव प्रक्रिया करण्यात येते. जो कोणी जास्त बोली लावेल त्या वाहन मालकाला तो नंबर दिला जातो.तर जम्पिंग नंबर ( दुसऱ्या सिरीज मधील ) त्यासाठी देखील जास्त शुल्क मोजावे लागते.परिवहन कार्यालयात नवीन नंबर साठी १७ एप्रिल रोजी सिरिज सुरू झाली . त्यात एकूण १४ आकर्षक नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केले होते. त्यातील ९ नंबर साठी जास्त अर्ज असल्याने जास्त बोली लावणाऱ्या वाहन मालकाला तो नंबर देण्यात आला. ९ नंबरसाठी शासकीय शुल्क २ लाख ५० हजार रूपये इतके असून नंबरसाठी जवळपास अडीच कोटी रूपयांची गाडी खरेदी केलेल्या वाहन मालकाने ४ लाख ५० हजारांची बोली लावली असल्याने त्या वाहन मालकाला शासकीय शुल्क २ लाख ५० हजार आणि बोली लावलेली ४ लाख ५० हजार असे मिळून ७ लाख रुपये मोजावे लागले. त्यामुळे लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून ८ लाख २२ हजार ३२२ रुपयांचा महसूल आरटीओच्या तिजोरीत पडला.