नागा साधूने लांबविली सोन्याची अंगठी आणि चेन

पंचवटी : प्रतिनिधी
मखमलाबाद-म्हसरूळ लिंकरोडवरील गणाधीश बँक्वेट समोरून जात असलेल्या मॉर्निंग वॉक करणार्‍या व्यक्तीला जवळ बोलावून चारचाकी वाहनात साधूच्या वेशात असलेल्या साधूने सापुतारा रोड कुठे आहे, अशी विचारणा करत भुरळ पाडून सोन्याची अंगठी आणि चेन लांबविल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात
आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, नीलेश भास्कर सोनवणे (वय 39, रा. गुरुदत्त अपार्टमेंट, फ्लॅट नं.3, रामकृष्णनगर, मखमलाबादरोड) हे आपल्या पत्नीसह दि. 14 रोजी सकाळी 7 वाजता घरापासून मखमलाबाद ते राऊ चौकाकडे जाणार्‍या रस्त्याने मॉर्निंग वॉक करत असताना गणाधीश बँक्वेट हॉलजवळ त्यांच्याजवळ एक पांढर्‍या रंगाच्या चारचाकी वाहनातून चार जण जवळ थांबून सापुतारा रोड कोणता आहे असे विचारले. त्यावेळी गाडीतील ड्रायव्हर सीटच्या बाजूला साधूच्या वेशात बसलेल्याने जवळ बोलावून दोघांनाही आशीर्वाद देऊन, तुम्हाला नागा साधूचे आशीर्वाद आहे. देव तुमचे कल्याण करील, तुम्हाला लवकरच मुलबाळ होईल, असे बोलून भुरळ घालून तुमच्या हातातील अंगठी व गळ्यातील चेन काढून द्या, असे सांगितल्यावर सोन्याची अंगठी व गळ्यातील चेन काढून दिली. त्यावेळी नीलेश सोनवणे व त्यांच्या पत्नीला काहीच समजले नाही. त्यानंतर पांढर्‍या रंगाच्या गाडीत बसलेल्या नागा साधूसह गाडीत बसलेल्या दोन ते तीन जणांनी धूम ठोकून पळ काढला. या घटनेत 33 हजार 580 रुपयांची 5 ग्रॅम 27 मिली वजनाची सोन्याची अंगठी आणि 94 हजार 400 रुपयांची 13 ग्रॅम 15 मिली वजनाची सोन्याची चेन त्यात 1 ग्रॅम, 89 मिली वजनाचे सोन्याचे पेंडंट असा सुमारे 1 लाख 27 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सतीश वसावे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *