नार पार योजनेत नांदगावचा समावेश व्हावा : महेंद्र बोरसे
नांदगाव(आमिन शेख):- नार पार गिरणा नदीजोड योजनेद्वारे नार, पार आणि औरंगा या तीन पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातुन १०.६४ टीएमसी पाणी वापर प्रस्तावित आहे. या प्रकल्पांतर्गत नाशिक जिल्हयातील सुरगाणा तालुक्यातील विविध ठिकाणी ९ धरणे बांधुन, या धरणातुन पाणी उपसा करुन गिरणा उपखोऱ्यात वळविणे प्रस्तावित आहे. या नदीजोड योजनेव्दारे नाशिक जिल्हयातील सुरगाणा, कळवण, देवळा व मालेगाव तालुक्यातील ३२४९२ हेक्टर व जळगाव जिल्हयातील भडगाव, एरंडोल, व चाळीसगाव १७०२४ हेक्टर असे एकुण ४९५१६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.सदर प्रस्तावित प्रकल्पात सतत अवर्षणग्रस्त व अतीतुटीच्या नांदगाव तालुक्याचा समावेश वगळण्यात आला आहे, ही बाब विपुलतेच्या खोऱ्यातून तुटीच्या खोऱ्यात पाणी वळविणे ह्या तत्वालाच छेद देणारी आहे.
शासकीय खर्चाने मोठया उपसा सिंचन योजना हाती घेण्यासाठी शासन निर्णय दि. २३.११.२०१६ मधील तरतुदीनुसार तत्कालीन व वर्तमान मुख्यमंत्री महोदयांनी सदर योजना हाती घेण्यास मान्यता दिली आहे. या योजनेस मा. राज्यपाल महोदय यांची दि.०९.०८.२०२४ रोजी तत्वतः मान्यता प्रदान केलेली आहे.
नार पार नदीजोड प्रकल्पाच्या शासन निर्णयानुसार असलेल्या अटी बघता हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेणेकामी राज्य सरकारची प्रबळ इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे . कारण केंद्रिय जलशक्ती मंत्रालयाने हा प्रकल्प अतिशय खर्चिक असल्याने यापूर्वी रद्द केला होता, परंतू विधान सभेच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने पुढाकार घेत १०.६४ टीएमसी पाणी वळविणेसाठी ७४६५.२९ कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली आहे.
ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पात नांदगावचा समावेश झाला पाहिजे अशी मागणी जनतेतून वारंवार येत आहे त्या दृष्टीने शासन स्तरावर पाठपुरावा होणे गरजेचे आहे. कारण निर्गमित शासन निर्णयानुसार नव्याने आर्थिक दायित्व निर्माण होईल अशा घटकांचा शासन मान्यतेशिवाय प्रकल्पात समावेश करू नये ही अट लक्षात घेता सदरच्या तांत्रिक बाबीवर मात करून नांदगाव तालुक्याचा समावेश होनेकामी सततचा पाठपुरावा होणे गरजेचे आहे. कारण प्रकल्प जरी राज्य सरकार राबविणार असले तरी केंद्रीय प्रदूषण, पर्यावरण आणि डिझाईन सर्कल ह्यांच्या परवानगी आवश्यक आहेत,तसेच केंद्रिय जल आयोगाची (CWC) परवानगी असल्याशिवाय राज्यात प्रकल्प सुरु होत नाही, त्यामूळे हे सर्व सोपस्कार पूर्ण होण्यापूर्वी तातडीचा पाठपुरावा होणे अपेक्षित आहे. गेल्याच आठवड्यात चांदवडचा समावेश व्हावा यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली आहे त्याच धर्तीवर नांदगाव तालुक्याचा समावेश होणेकामी पाठपुरावा होणे गरजेचे आहे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी केली आहे.
*नार पार मध्ये समावेश झाला तर तालुक्याचे भाग्य उजळेल…!*
नांदगाव तालुका हा कायम दुष्काळ ग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे याआधी मांजरापाडा या मोठ्या योजनेत नांदगावला वगळण्यात आले आताही नार पार ही योजना सुरू होत आहे आणि यातून तालुक्याला वगळले आहे राजकीय वादातून आणि श्रेयवादातून पुन्हा एकदा नांदगाव तालुका हा वंचीत राहिला आहे यामुळे नांदगाव तालुक्यातील जनतेने जनरेटा लावून या योजनेत तालुक्याचा समावेश करावा या योजनेत समावेश झाला तर नांदगाव तालुक्याचे भाग्य उजळेल हे तितकेच सत्य आहे.