सिडको : प्रतिनिधी
नाशिक शहर हे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर. पण जसजसा शहरीकरणाचा वेग वाढत गेला, तसतशी शहरातील नद्या आणि पर्यावरणाचे प्रश्न अधिक तीव्र होत गेले. त्यातलीच एक म्हणजे नासर्डी नदी. कधीकाळी ही नदी शहराला जीवनदायिनी ठरत होती, परंतु अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे ती कचरानदी बनली होती.
सिडको विभागाचे अरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे यांचा संकल्प, मेहनत आणि दूरदृष्टी या सगळ्यांचं फलित म्हणजे हे नंदिनी कॉर्नर हेच आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून संजय गांगुर्डे हे नंदिनी नदीच्या स्वच्छतेसाठी झटत आहेत. त्यांनी केवळ एक प्रशासनिक जबाबदारी म्हणून नाही, तर वैयक्तिक तळमळ म्हणून ही जबाबदारी घेतली. नियमितपणे नदीपात्राची स्वच्छता, कचर्याचे वर्गीकरण, स्थानिक नागरिकांशी संवाद आणि जागृतीचे उपक्रम चालवत त्यांनी या परिसरात नवसंजीवनी फुंकली.
नंदिनी कॉर्नर ही एक केवळ नदीकाठची जागा नाही, ती एक जिवंत उदाहरण आहे की जिथे स्वच्छता, सौंदर्य आणि नागरी सहभाग या सगळ्यांचा संगम साधला आहे. फुलझाडांनी सजलेला परिसर, सुशोभित बेंचेस, माहितीफलक, पर्यावरणपूरक सजावट आणि स्वच्छतेचा आदर्श ठेवणारी ही जागा आता शहरवासीयांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे.आज येथे येणारे लोक केवळ फोटो काढून जात नाहीत, तर या जागेच्या देखभालीसाठी काहीतरी करावं यासाठी पुढाकार घेत आहेत. अनेकांनी आपल्या कुटुंबासह येथे भेट देऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश घेतला आहे. या यशस्वी उपक्रमामुळे नाशिक महानगरपालिकेच्या इतर अधिकारी आणि विभागांनाही प्रेरणा मिळाली आहे. नदी स्वच्छता ही केवळ एकवेळची मोहीम न राहता, ती दीर्घकालीन जबाबदारी बनावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. नंदिनी कॉर्नरने एक नवा मापदंड ठरवला आहे. नाशिक शहरातील ज्या ज्या भागातून नदीत वाहत जाते, त्या त्या भागात अशाच पद्धतीचे असे अनेक ‘नंदिनी कॉर्नर’ शहरात तयार व्हावेत, यासाठी नागरी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रत्येक विभागात एक कोपरा असा असावा, जिथे सौंदर्य, स्वच्छता आणि सामाजिक जागरूकता यांचा संगम होतो. हे केवळ शहराच्या सौंदर्यासाठी नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त आहे.