जगण्यासाठी आपण दीपस्तंभ व्हावे – नरेंद्रचार्य महाराज

प्रवचन दर्शन सोहळ्यासाठी भक्तांची गर्दी

इंदिरानगर| वार्ताहर | प्रारब्ध प्रमाणे भोग भोगावे लागतात. पण ध्येयापासून दूर जावू नये. गुरूने सांगितलेल्या मार्गाने भक्ताने चालावे. कुणाला फसवू नये, छळू नये. आपल्यापासून कोणाला उपद्रव होणार नाही असे वागावे. इतरांना जगण्यासाठी आपण दीपस्तंभ व्हावे असे अनमोल विचार अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी भक्तांना मार्गदर्शन करताना मांडले .
उत्तर महाराष्ट्र उपपिठाच्या वतीने जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन, प्रवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन असे आशेवाडी जवळील जनम संस्थानाच्या उपपिठात करण्यात आले आहे. त्याप्रसंगी भक्तांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. संस्थानचे श्रीनाद ढोलपथक वाजवून महाराजांचे जंगी स्वागत करण्यात आले. महिलांनी दुर्तफा रांगा लावून फुलांचा वर्षाव केला. यजमानांच्या हस्ते माऊलींचे पूजन करण्यात आले. यावेळी धुळे, जळगाव ,नाशिक, नंदुरबार, अहमदनगर यासह महाराष्ट्रातील विविध भागातील भक्तांनी समस्येवर मार्गदर्शन मिळण्यासाठी तसेच दर्शनासाठी गर्दी केली होती.
महाराजांनी मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की, अध्यात्म हा ऐकण्याचा नाही तर जगण्याचा विषय आहे .मनात भाव ठेवला तर देव भेटतो. यासाठी मागण्याची आवश्यकता भासत नाही. दहा मिनिटे भक्ती करा. स्वप्नातही कुणाचे वाईट चिंटू नका. सद्गुरूंवर नितांत प्रेम करा. मन आणि बुद्धी यांची सांगड घालून जीवन जगले पाहिजे. देव आपल्यातच आहे ,राक्षस सुद्धा आपल्यातच आहे. जो बुद्धीचा योग्य वापर करत करतो तो देव व बुद्धीचा योग्य वापर करत नाही तो राक्षस होय. देवत्व यावं म्हणून माणसात लीनता, विनम्रता, साधक-बाधक विचार करण्याची क्षमता आली पाहिजे. हे सगळं करण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे.
ऋषीमुनींनी हेच तत्वज्ञान सांगितले आहे. ते तत्वज्ञान म्हणजे उपासना. उपसना हा मन एकाग्र करण्याचा व्यायाम आहे. मनाची एकाग्रता वाढली की संयम वाढतो. त्यामुळे आलेले प्रसंग हातात येतात. जीवनाच्या नावेत सुखदुःख येणारच आहेत. त्यात घाबरून जाऊ नये .जसे जीवनात दुःख येतात तसाच आनंद येतो. आनंद मात्र माणसाला पचवता आला पाहिजे .पचवता आलं नाही तर घमंड येथे अहंकार वाढतो. वेळ आपल्यासाठी थांबत नाही .त्यामुळे वेळेचा सदुपयोग करावा असेही स्वामीजी यावेळी म्हणाले.

नाशिक येथील जनम संस्थानाच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठात पहिल्यांदाच गुरुमाता आल्या होत्या. श्रावण मास हा शिव – पार्वतीचा मनाला जातो. या मासात गुरूमाता देखील नाशिक पीठावर आल्याने भक्तांना अधिक आनंद वाटला. भक्तांनी गुरू मातेचे जंगी स्वागत केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *