मुलगा – मुलगी भेद करू नका – नरेंद्राचार्य

प्रवचनाच्या दुसऱ्या दिवशी देखील भाविकांच्या दर्शनासाठी रांगा

इंदिरानगर:  वार्ताहर

” ज्याचा सखा हरी, त्यावरी विश्व कृपा करी”. म्हणजेच ज्याला गुरूची साथ असते, तो कोणत्याही संकटावर मात करू शकतो. संकट आले तर त्याचे निराकरण करण्यासाठी फक्त दहा मिनिटे भक्ती करा . भक्तीने प्रेम निर्माण होते . जशी भक्ती तसे फळ मिळत असते. काही लोक प्रचिती आली की भक्ती करणे बंद करतात. भक्तीत सातत्य ठेवा. भक्ती केली तरच अनुभव मिळेल. कुणाचेही वाईट करायचे नाही ही भक्तीमार्गाची शिकवण आहे . मुलगी जन्माला आली की काहींना संकट पडल्यासारखे वाटते. मुलगा – मुलगी भेद करू नका असा अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्यजी श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज भक्तांना उपदेश केला.
जनम संस्थानाच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ येथे आयोजित दोन दिवसीय समस्या मार्गदर्शन, प्रवचन व दर्शन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. भक्तांना मार्गदर्शन करताना स्वामीजी म्हणाले की , तुम्ही जगा , दुसर्‍याला जगवा. कोणाबद्दल वाईट विचार करू नका . प्रत्येकाने परमेश्वराचे नामस्मरण करावे .मात्र त्यात शुद्धता असावी . नामस्मरण करताना कोणाबद्दलही वाईट विचार मनात येता कामा नये . खाण्याच्या पथ्यासोबत बोलण्याचे देखील पथ्य पाळले तर जीवन सुखी होते .
स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज पुढे म्हणाले की, जीवनात दोन मार्ग आहेत . एक प्रपंच आणि दुसरा परमार्थ . प्रपंचात आनंदी जीवन जगायचे असेल तर परमार्थ करा . जीवनातला कमीपणा काढून टाका . व्यक्तीने स्वतःला कमी लेखू नये . नावात सामर्थ्य निर्माण होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. देव हा प्रत्येक ठिकाणी आहे . प्रत्येक माणसात देखील देव असल्याचे ते यावेळी म्हणाले .स्वामींनी यावेळी अंधश्रद्धेवर प्रहार केले . ते म्हणाले की , भानामती , करणी केलेली आहे असे मनातून काढून टाका . हे सगळे थोतांड आहे. यात काहीही सत्यता नसून ही एक अंधश्रद्धा आहे. जीवनातून अंधश्रद्धा समूळ नष्ट करा. दारू जीवनाचा नाश करते. सगळ्या व्यसनांपासून माणसाने दूर राहिले पाहिजे. वडील व्यसनी असतील तर कदाचित मुलगा सुद्धा त्याच मार्गाला जावू शकतो. व्यसनांपासून परावृत्त होऊन भक्ती मार्गाला लागा असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *