नाशिक : प्रतिनिधी
शहरात फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, दुपारच्या वेळेत उकाडा जाणवत आहे. पहाटे वातावरणात किंचित गारवा जाणवत असला तरी सकाळी दहाच्या सुमारासच तापमान झपाट्याने वाढत आहे. सध्या कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवले जात असून, पुढील काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात
येत आहे.
हवामानातील या बदलामुळे नागरिक त्रस्त झाले असून, दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र आहे. फेब्रुवारीतच जाणवणार्या या उष्णतेमुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात तापमान 40 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षी शहरात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदाही उन्हाचा कडाका तीव्र राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
उन्हापासून बचावासाठी नागरिकांकडून विविध उपाय केले जात आहेत. दुपारच्या सुमारास रसवंतिगृहे, थंडपेयांचे स्टॉल आणि आइस्क्रीम पार्लर येथे गर्दी वाढत आहे. सनग्लासेस, टोपी, स्कार्फ, स्टोल यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. वाहनधारक सावलीच्या शोधात झाडाखाली किंवा इमारतींच्या आडोशाला वाहन उभे करत आहेत.
आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. पुरेसे पाणी व द्रवपदार्थ घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र ठरण्याची चिन्हे दिसत असून, प्रशासनानेही आवश्यक तयारी सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे.
मागील पाच दिवसांचे तापमान
कमाल किमान
19 फेब्रुवारी 31.1 17.7
18 फेब्रुवारी 32.0 16.8
17 फेब्रुवारी 31.8 15.8
16 फेब्रुवारी 32.8 14.2
15 फेब्रुवारी 32.6 15.2
Nashik gets a hot summer in February