नाशकात शिवसेनेला धक्का : माजी नगरसेवक बंटी तिदमे शिंदे गटात : प्रवेश होताच महानगरप्रमुखपदी नियुक्ती

नाशिक प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांनी शिव सेनेत बंड केल्यानंतर नाशिक शहरातून अद्याप एकाही नगरसेवकाने शिंदे गटाला पाठींबा दिला नव्हता. मात्र आता शिंदे गटाने सेनेला धक्का दिला असून माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष असलेले बंटी तिदमे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सेनेला धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.

तिदमे यांच्याकडे नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. त्यामुळे आता ही संघटना सुद्धा शिंदे गटात विलीन होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक शहरात शिवसेनेला हा मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे. याबाबत तिदमे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा देऊन आपण शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे सांगितले आहे. शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातून दोन आमदार आणि एका खासदाराने त्यांना पाठबळ दिले होते. त्यानंतर नाशिक शहरातील काही नगरसेवक सुद्धा शिंदे गटात सामील होतील अशी चर्चा सुरू होती. परंतु आत्तापर्यंत उघडपणे कोणीही शिंदे गटात गेले नव्हते. मंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांचे निकटवर्ती असलेले काही नगरसेवक शिंदे गटात जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु मंगळवारी नगरसेवक म्हणून कारकीर्द केलेले शिवसेनेचे बंटी तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तिदमे यांच्यानंतर शहरात आणखी कोणी शिंदे गटात जाणार का याकडे देखील चर्चा होऊ लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *