नाशिक बाजार समिती; पिंगळे, चुंभळे यांचे भवितव्य आज मतदान पेटीत होणार बंद 

पंचवटी : सुनील बुनगे
जिल्ह्यातली १४ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज (दि.२८) रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून विशेषतः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, शिंदे गट (शिवसेना ) विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असली तरी प्रत्यक्षात लढत माजी खासदार तथा माजी सभापती देवीदास पिंगळे व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यात होणार आहे. दरम्यान अपक्ष उमेदवार माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे यांच्यामुळे या निवडणुकीत अजूनच रंगत वाढली आहे. आज निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदार बाजार समितीचे सूत्र कोणाच्या हातात देतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यातच गेल्या निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडी बघता यावेळची निवडणूक पिंगळे व चुंभळे यांनी चांगलीच प्रतिष्ठेची केली आहे. गेल्या निवडणुकीतील चुंभळेचे सहकारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वजनदार नेते संपत सकाळे यांनी यावेळी पिंगळे यांची साथ दिल्याने त्र्यंबकेश्वर भागात चुंभळे यांना काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीत पिंगळे यांनी काही जुने चेहरे असलेले विश्वास नागरे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दिलीप थेटे व तुकाराम पेखळे यांना घेत काही नवीन चेहऱ्यांचा समावेश केला आहे. यात पिंगळे यांचे एकेकाळचे सहकारी असलेले राजाराम धनवटे यांना डावलल्याने धनवटे यांनी चुंभळे यांचा हात धरला आहे. चुंभळेंच्या पॅनल मध्ये धनवटे वगळता सर्वच नवीन चेहरे असून यात विशेष करून तालुका संघ, सेंट्रल गोदावरी कृषक सहकारी संस्था, मखमलाबाद सोसायटी आदी ठिकाणी संचालक राहिलेले प्रल्हाद काकड आणि धनाजी पाटील यांच्यासह इतर नवीन चेहऱ्यांना पॅनल मध्ये स्थान दिले आहे . त्यातच माघारी नाट्यानंतर चर्चेत राहिलेले पिंगळे यांचे बंधू माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे अपक्ष राहिल्याने पिंगळे विरुद्ध पिंगळे विरुद्ध चुंभळे अशी लढत अतिशय रंगतदार होणार आहे.
      पिंगळे व चुंभळे यांच्या दोन्ही पॅनल कडून बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करण्यात आला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले आहेत. तर अपक्ष असलेले गोकुळ पिंगळे यांनी ” एकला चलो”ची भूमिका घेतल्याने त्याचा परिणाम कोणावर होतो हे मात्र निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे . यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र वेगळेच चित्र बघायला मिळणार असल्याचे देखील मिळणार आहे . एकाच पॅनलला बहुमत मिळणार असेल तर या निवडणुकीत अनेकांना झटका मिळणार असल्याची देखील चर्चा देखील ऐकायला मिळत आहे .त्यामुळे मतदार आज कोणाच्या पारड्यात आपल्या मताचे दान टाकतात मात्र उद्या (दि.२९) रोजी निकाल लागल्यानंतर समजणार आहे .त्यामुळे आज पिंगळे, चुंभळे यांचे भवितव्य आज मतदान पेटीत होणार बंद होणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *