नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुमारे सहा हजार कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, गुरुवारी (दि. 13) करण्यात येणार आहे. अनेक कामांची टेंडरप्रक्रिया पूर्ण झाली असून, ती आता अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त व कुंभमेळा संयुक्त प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.
रस्ते, धरणे, पूल, मंदिर विकासाचा समावेश
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपला असताना, अनेक विकासकामांना अद्याप प्रारंभ न झाल्याबद्दल विविध स्तरांवरून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर डॉ. गेडाम यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी होणार्या शुभारंभ कार्यक्रमात सर्व प्रमुख रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ करण्यात येईल.
आणखी 3000 कोटींची कामे
डिसेंबरपर्यंत आणखी तीन हजार कोटींंच्या कामांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती देताना डॉ. गेडाम म्हणाले की, यात अजिंठा रोडचे भूसंपादन, पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्ते सुधारणा, तसेच द्वारका सिग्नलवरील अंडरपास या कामांचा समावेश असेल. त्यासोबतच त्र्यंबकेश्वर दर्शनपथ, अतिरिक्त घाटबांधणी आणि जलसंपदा विभागाच्या काही प्रलंबित प्रकल्पांचाही समावेश या टप्प्यात होणार आहे.
पाणीपुरवठा नियोजन
शहराला लागणार्या अतिरिक्त पाण्याच्या गरजेसाठी मुकणे धरणातून नाशिकसाठी, तर बेझे धरणातून त्र्यंबकेश्वरसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. धार्मिक कामांसाठी पाणी आरक्षण करता यावे यासाठी शासनाने अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार नियोजन केले जाईल, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले.
ठेकेदाराची लेखी हमी आवश्यक
द्वारका सर्कलवरील अंडरपासचे काम सिंहस्थापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराने काम वेळेत पूर्ण करण्याची लेखी हमी दिल्यासच या कामाला मंजुरी दिली जाईल, असे गेडाम यांनी स्पष्ट केले. एकंदरीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार्या या कार्यक्रमातून नाशिकच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. आगामी कुंभमेळ्यासाठी शहर सज्जतेच्या दिशेने पुढे जात आहे.
या कामांचा होणार शुभारंभ
♦ जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या फेज-1 प्रकल्पाचा शुभारंभ.
♦ सार्वजनिक बांधकाम विभागाचे आठ रस्ते प्रकल्प. (2,270 कोटी)
♦ मनपाचे 900 कोटींचे रस्तेकाम.
♦ सहा ते आठ पुलांच्या बांधकामांची सुरुवात.
♦ मुकणे व बेझे या धरणांतून पाणीपुरवठा प्रकल्पांना गती.
♦ पंधराशे कोटींच्या एसटीपी विकास प्रकल्पाचा प्रारंभ.
♦ रामकुंड परिसर, सीसीटीव्ही व्यवस्था आणि पुरातत्त्व मंदिर विकास प्रकल्प या सर्व कामांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांसाठी एकत्रित सुमारे सहा हजार कोटींच्या कामांना प्रारंभ होणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले.