खोदकाम झालेल्या रस्त्यामुळे वारकर्यांची कसरत
त्र्यंबकेश्वर :
त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी सायंकाळपर्यंत लक्षणीय संख्येने पायी दिंड्यांनी वारकरी दाखल झाले आहेत. आज, मंगळवारी (दि.13) दशमीला येणार्या सर्व दिंड्या सायंकाळपर्यंत शहरात येतील. मुक्कामाच्या ठिकाणावर स्थिरावतील. पूर्वपरंपरेने येणार्या दिंड्या दशमीला येत असतात. मात्र, नव्याने सुरू झालेल्या दिंड्या प्रवासातील मुक्कामाच्या म्हणजेच ठेप्यांच्या सोयीनुसार एक-दोन दिवस अगोदर येतात.
वारकरी भक्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाने त्रस्त झाले आहेत. नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावरचा प्रवास यातनादायक असल्याचे मत वारकरी व्यक्त करताना आढळत होते. रस्त्याच्या एका बाजूने दुहेरी वाहतूक सुरू आहे. पायी दिंड्यांना खोदकाम झालेल्या रस्त्याच्या बाजूने वळवण्यात आले आहे. मुरूम आणि माती याची उडालेली धूळ, तर काही ठिकाणी खडीमधून चालताना दमछाक होत आहे. मोरी आणि पुलासाठी खोदकाम झालेल्या भागात तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार केला आहे. दिंडीसोबत असलेला रथासह वारकरी या रस्त्याचा वापर करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम सुरू आहे. जेसीबी व पोकलेनसारखी यंत्रे, त्यासोबत वेगाने चालवण्यात येणारे ट्रॅक्टर आणि हायवा ट्रक चालताना उरात धडकी भरवत आहेत. नुकतेच त्र्यंबकेश्वर येथे हायवा गाडीखाली चिरडल्याने दोन भक्त ठार झाल्याची घटना घडलेली आहे. मात्र, रस्त्यावर वेगाने धावणारे, क्षमतेपेक्षा जास्त भरलेले ट्रॅक्टर आणि हायवा यांच्या वाहतुकीवर कोणतेही नियंत्रण असल्याचे दिसत नाही. याबाबत शासन यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. यात्रा कालावधीत अशा प्रकारच्या धोकेदायक वाहतुकीवर निर्बंध घालण्याचे औचित्य दाखवण्याचे प्रशासनाला सुचलेले दिसत नाही.