गोरख काळे
शिवसेना आणि मनसे यांची पहिली संयुक्त सभा शुक्रवारी (दि. 9) नाशकात झाली. तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येत ऐतिहासिक हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर सभा घेतली. खास ठाकरे शैलीत उद्धव- राज यांनी ती गाजवलीही. खचाखच भरलेल्या मैदानात उपस्थितांचा भ्रमनिरास न होता ठाकरे बंधूंनी सध्याच्या राजकारणावर प्रकाश टाकत भाजपच्या फक्त आम्ही या वृत्तीवर हल्ला करत नाशिक महापालिकेची सत्ता हाती देण्याचे आवाहन नाशिककरांना केले. दरम्यान, उद्धव-राज ठाकरे यांनी सभा गाजवली, पण निवडणुकीचे मैदान मारणार का, हे पाहावे लागेल.
उद्धव व राज या ठाकरे बंधूंच्या सभेमुळे नाशिक महापालिका निवडणुकीची वातावरणनिर्मिती झाली आहे. यामुळे नक्कीच ठाकरेंच्या दोन्हीकडील उमेदवारांमध्ये उत्साह संचारला असेल. सत्तेत नसताना आणि स्थानिक एक-एक प्रमुख नेत्याने साथ सोडूनही आजही आपल्यामागे कार्यकत्यार्ंची हजारोंची फौज मागे असल्याचे या सभेतून स्पष्ट दिसले. विशेषतः ठाकरे ब्रँड काय आहे, हे या सभेने स्पष्ट दाखवून दिले. नावातच सारे काही आहे, हे ठाकरे यांच्या सभेने दाखवले. या संयुक्त सभेतून नाशिकमधील मुद्द्यांना राज व उद्धव ठाकरे यांनी हात घालत शहराची सत्ताधार्यांनी किती बकाल अवस्था केली आहे, हे निदर्शनास आणून दिले. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज यांनी नाशिकमधील विषयांना हात घातल्याचे दिसले. विशेषतः मनसेची सत्ता असताना त्यांनी काय केले होते आणि त्यानंतर शहराची काय अवस्था झाली, हे सांगताना भाजपने नाशिककरांना कसे वेड्यात काढले, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आश्वासने दिली, त्याची यादीच वाचून दाखवत एकप्रकारे भाजपाची पोलखोल केली. याशिवाय त्यांनी पैशाच्या बाजारावरून सत्ताधार्यांना घेरले. आपण नाशिकसाठी जे केले ते कोणीही केले नाही, हे सांगताना दिवंगत उद्योगपती रतन टाटा, आनंद महिंद्रा यांच्याकडून नाशिकच्या प्रकल्पासाठी मदत करून घेतली. दोन्ही ठाकरे बंधूंनी केलेल्या आक्रमक भाषणांनी भाजपला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले. यावेळी राज ठाकरे यांच्या भाषणाचे वेगळेपण म्हणजे, त्यांनी घोषणा देणार्यांना थांबवले. जेव्हा मी सांगेन तेव्हा घोषणा द्या. त्यानंतर त्यांनी तडाखेबंद भाषणाला सुरुवात केली. लाडकी बहीण या योजनेतून समाज आणि शहर व राज्याला उद्ध्वस्त करण्याचे काम भाजप करीत आहे. घरोघरी पैसे वाटून मते विकत घेत आहे. हे पैसे किती दिवस पुरणार आहेत. हे पैसे भाजपने आणलेत कुठून? याचा विचार प्रत्येक भगिनीने केला पाहिजे. कारण भाजप आपल्या कारभारातून आपल्या पुढच्या पिढ्यांची, लहान मुलांची व शहरांचे भवितव्य नष्ट करीत आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना नाशिककरांना आम्हाला संधी द्या, या शहराचे आणि तुमचे भवितव्य घडवून दाखवू. हे सर्व आम्ही सांगत आहोत. अन्यथा पुन्हा भाजपच्या थापांना भुललात तर हे शहर आणि नागरिकांचे भवितव्य संकटात गेल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले, की ममता बॅनर्जींसह तेथील संपूर्ण बंगाल हुकूमशाही विरोधात रस्त्यावर उतरला आहे. मग आपण शेपूट घालून बसणार का? हा वचननामा आहे; हा छापलेला रंगीत कागद नाही. हा ठाकरेंचा शब्द आहे. ही बोगस मोदी गॅरंटी नाही. ठाकरे जे बोलतात ते करतात. आम्ही कुणाच्या कामाचं श्रेय घेत नाही. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या दुटप्पी हिंदुत्वावर टीका केली. गेल्या दोन वषार्ंतील ही चौथी सभा आहे. आजच्या सभेत मला आनंद होतोय. माझ्यासोबत माझा भाऊ आणि मनसेचा अध्यक्ष राज आहे. ही सर्व जनता तुमच्याकडे अपेक्षेने पाहतेय. त्यांच्या व्यथा संजय आणि राजने मांडल्या. राजने तर त्यांच्याकडे महापालिका असताना काय कामे केली, हे अभिमानाने सांगितलं. नाशिक आणि मुंबईत शिवसेनेने कामं केली. काम करणारे दोन भाऊ एकत्र आले तर नाशिकचा काय उत्कर्ष होईल, याचा तुम्ही विचार करा, असेही ठाकरेंनी यावेळी सांगितले.
भाजपला आजही दुसर्या पक्षातील लोकांना घेऊन निवडणूक लढवायची वेळ येते. एवढ्या वषार्ंपासून पक्ष असताना अद्याप त्यांना स्वतःचे उमेदवार मिळत नाहीत. दुसरे लोक घेऊन स्वतःच्या निष्ठावंत कार्यकत्यार्ंची बोळवण होत असल्याचे सांगून ठाकरे बंधूंनी भाजपच्या फोडाफोडीवर टीका केली. दरम्यान, अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागली असून, विराट सभेतून त्यांनी शक्तिप्रदर्शन करत भाजपसह शिंदेसेनेला इशारा दिला आहे.