‘श्री शिवचरित्रातून आम्ही काय शिकलो?’ या विषयावर त्यांनी केले भाष्य
नाशिक : प्रतिनिधी
शिवछत्रपतींच्या चरित्राकडे पाहताना केवळ रंजक किंवा
स्फूर्तिदायक कथा म्हणून न पाहता त्यांच्या महानतेचा जीवनादर्श म्हणून वर्तमानात आपण शिवकालातील राष्ट्रनिष्ठा असणारी माणसे घडवायला हवीत. तेच आपल्या समोरचे आव्हान आहे, असे शिवव्याख्याते अभय भंडारी यांनी केले. गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे स्व. पंडितराव खैरे स्मृती व्याख्यानात 14 वे पुष्प गुंफताना ‘श्री शिवचरित्रातून आम्ही काय शिकलो?’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर योगेश खैरे, योगेश हिरे आदी मान्यवर उपस्थित होते. भंडारी पुढे म्हणाले की, शिवचरित्राचे आपण इतिहासाच्या दृष्टीने अवलोकन करायला हवे.त्यांची निर्णयक्षमता, आचार आणि विचारक्षमता यांचे अध्ययन करून त्यांची केवळ प्रेरणा नको तर ती जीवन जगण्याची सूत्रे झाली पाहिजे. इतिहासाचा वारसा म्हणून छत्रपतींच्या जीवनाकडे पाहिले पाहिजे. शिवाजीराजांनी जे मावळे तयार केले, त्यातला एकही मावळा फितूर करता आला नाही ही कबुली खुद्द औरंगजेबाने दिली. प्रारंभी माजी महापौर स्व. पंडितराव खैरे यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली तसेच त्यांच्या प्रतिमेला त्याचबरोबर आज छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवव्याख्याते अभय भंडारी यांचा स्मृतिचिन्ह देऊन चित्रकार राजा पाटेकर यांनी सन्मान केला. तसेच हिरालाल परदेशी यांनी योगेश खैरे तर नवलनाथ तांबे यांनी योगेश हिरे यांचा सत्कार केला. व्याख्यानानंतर अक्षरकाव्य समूह, नवी मुंबई प्रस्तुत ‘उत्सव कवितांचा, अभ्यास मराठीचा’ हा कार्यक्रम झाला. यात क्षमा खडतकर, प्रज्ञा लळिंगकर, सायली डेगवेकर, पल्लवी देशपांडे आदींनी आपला सहभाग नोंदवला.
नाशिक वसंत व्याख्यानमाला
आजचे व्याख्यान
स्व. द. गे. खैरनार (गुरुजी) स्मृतिव्याख्यान
1) प्रा. मनोज बोरगावकर, साहित्यिक, नांदेड
विषय : नदीचे स्वर आणि नाद : नदिष्ट
2) सिंफनी करा ओकेक्लब प्रस्तुत नमिता राजहंस व प्रशांत चंद्रात्रे.