मुख्यमंत्री फडणवीस : विरोधक निवडणूक पर्यटक
नाशिक ः प्रतिनिधी
नाशिकमध्ये येऊन श्रीरामाचे नावही न उच्चारणार्यांमध्ये आता ’राम’ उरलेला नाही. ’जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं.’ विरोधकांची अवस्था ही पर्यटकांसारखी झाली आहे. निवडणूक आली की, पर्यटनासाठी यायचे आणि पाच वर्षे पुन्हा गायब व्हायचे. माझं नाशिकशी नातं कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहील. विरोधी पक्षनेता असताना कोविड काळात अनेक नेते घरी बसले असताना आपण नाशिकमधील कोविड केअर सेंटर आणि आयसीयूपर्यंत स्वतः भेटी दिल्या होत्या. सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकमध्ये तीस हजार कोटींची कामे होणार असून, संस्कृती व आधुनिकतेचासंगम करत नाशिकला आधुनिक शहर बनवू, त्यासाठी महापालिकेत भाजपाला सत्ता द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या सर्व अधिकृत व पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 11) गोदाघाटावर दुपारी सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, कुंभमेळा तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, आ. अॅड. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, भाजप सरचिटणीस विजय चौधरी, शहराध्यक्ष सुनील केदार, सरचिटणीस सुनील देसाई, डॉ. भारती पवार, बबनराव घोलप, बाळासाहेब सानप, डॉ. अपूर्व हिरे, रवी अनासपुरे, अजित चव्हाण, प्रदीप पेशकार, सुनील बच्छाव, गिरीश पालवे, विजय साने, रश्मी बेंडाळे, श्याम बडोदे आदी पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.
तीस हजार कोटींचा विकास आराखडा
नाशिक व परिसरात सुमारे तीस हजार कोटींची विकासकामे हाती घेण्यात आल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, की नाशिक विमानतळाचा विस्तार करून ते वर्ल्ड क्लास बनवण्यात येत आहे. राज्य सरकारकडून 640 कोटी व केंद्र सरकारकडून 600 कोटी रुपये देण्यात येत आहेत. विद्यमान क्षमतेपेक्षा त्याची चारपट अधिक क्षमता निर्माण होणार आहे. नाशिकचा भविष्यातील कणा ठरणारा दहा हजार कोटींचा रिंगरोड, चार राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि नाशिक-चेन्नई महामार्गाला जोडणारा असेल. यामुळे उद्योग, पर्यटन व शहरीकरणाला गती मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडॉर, सहापदरी महामार्ग, समृद्धी महामार्गामुळे मुंबई दोन ते अडीच तासांत गाठता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक-पुणे दरम्यान 200 किलोमीटर वेगाने धावणार्या रेल्वे प्रकल्पाचीही माहिती त्यांनी दिली. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी द्वारका सर्कल येथे 400 कोटींचा अंडरपास, 2100 कोटींच्या निधीतून 60 प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून 50 वर्षे खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन त्यांनी दिले. गंगापूर धरणाची 35 वर्षे जुनी पाइपलाइन बदलून 247 प्रेशरयुक्त पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. गोदावरी स्वच्छतेसाठी एक हजार कोटींची गुंतवणूक, पुढील टप्प्यात आणखी 1500 कोटी, अत्याधुनिक एसटीपी आणि ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून नाशिक महापालिकेने देशात आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. शहरात चार हजार एआययुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तिसरा डोळा निर्माण करण्यात येत आहे. गुन्हेगारीवर कडक कारवाई करून नाशिकमध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित केल्याचा दावा त्यांनी केला. जिंदाल, रिलायन्स, महिंद्रा, सह्याद्रीसह विविध उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 57 हजार कोटींची गुंतवणूक नाशिकमध्ये आणल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. एचएएलमध्ये विमान निर्मितीसाठी 12 हजार कोटींची गुंतवणूक आणि डिफेन्स कॉरिडॉरचा नाशिकमध्ये विकास करण्याची शिफारस अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सन 2015 चा कुंभमेळा इतिहासातील सर्वांत सुरक्षित कुंभमेळा ठरला, ज्यात एकाही भाविकाचा मृत्यू झाला नाही, असे सांगून कुंभमेळ्याची खिल्ली उडवणार्यांवर त्यांनी टीका केली. साधुग्राम परिसरातील झाडांबाबत गैरसमज पसरवला जात असल्याचे सांगून, न्यायालयाचा निर्णय मान्य केला जाईल. पर्यावरण संवर्धनालाच प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. नाशिकला आधुनिकतेसोबत संस्कृतीची राजधानी आणि मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचा निर्धार असल्याचे सांगितले. आम्ही ब्लू-प्रिंट दाखवणारे नाही; प्रत्यक्ष काम करणारे लोक आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
द्वारकाचा वाहतूक प्रश्न सुटणार
द्वारका भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आगामी काळात सुटण्यासाठी
चारशे कोटींचा निधी मंजूर केला आहे. अंडरपास करून आधुनिक आणि नवीन पद्धतीने मांडणी करून हा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यानंतर एक सेकंदही येथे वाहतूक खोळंबा होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींना लखपती करणार
भाजप सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होईल, असे विरोधक सांगतात. परंतु जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही आणि त्याही पुढे जाऊन लाडकी बहीण लखपती करू, असे ठाम आश्वासन देत त्यांनी मतदारांना भाजपला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन केले.
विकासाच्या आड येणार्यांचे पंख छाटा : पंकजा मुंडे
महाराष्ट्राची देवभूमी नाशिक, जी पवित्रतेने नटलेली आहे. येथे स्वतः देवाभाऊ आलेले असताना आणि त्यांच्या हातात ’कमळ’ असल्याने नाशिककर जनता कमळाशिवाय कोणत्याही चिन्हाचा विचार करणार नाही, असे मत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे रविवारी (दि. 11) व्यक्त केले.
पंकजा मुंडे यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक महोत्सव नाही, तर नाशिकच्या विकासाचा पाया घालणारा उपक्रम आहे. त्यामुळे कुंभमेळ्याचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी नाशिकच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आवश्यक आहे. यामुळे शहरात कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठा विकास साधता येईल. कुंभमेळ्यासह शहराच्या विकासासाठी आवश्यक भूमिका बजावणे महत्त्वाचे आहे. नाशिक हे एक अस्पिरेशनल शहर आहे, जिथे मुंबई-पुण्यानंतर मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्यात येत आहे. मोठा उद्योग, मोठे व्यवस्थापन आणि मोठा विकास येथे घडवायचा असेल तर मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांचे आशीर्वाद आवश्यक आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंडे यांनी उदाहरण देत म्हटले की, जसे श्रीरामाने शूर्पणखेचे नाक कापले, तसे विकासात अडथळे निर्माण करणार्यांचे पंख छाटले जातील. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे महाराष्ट्रासह जगाचे लक्ष नाशिककडे गेलेले असल्याने मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेत भाजपला सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी केले. या भाषणातून पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, नाशिकच्या धार्मिक व आर्थिक विकासासाठी भाजपची सत्ता महत्त्वाची आहे.
Nashik will be made a modern city