नाशकात तांबेंची जित
हाय व्होल्टेज ड्रामामुळे संपूर्ण राज्यात गाजलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी एकतर्फी विजय मिळविला. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
नागपूरममध्ये भाजपाचा पराभव
मविआचे अडबाले विजयी
नागपूर : आरएसएसच्या बालेकिल्लयात भाजपाला महाविकास आघाडीने जोरदार धक्का दिला.
महाविकास आघाडी पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी येथे विजय मिळविला. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर मतदार संघात भाजप पुरस्कृत ना.गो गाणार यांचा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्याच होम पीचवर धक्का बसला आहे. महाविकास आघाडीने अपक्ष सुधाकर अडबालेंना पाठिंबा दिला होता. अडबाले यांना 55 टक्के मते मिळाली आहेत. सुधाकर अडबाले हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने त्यांची उमेदवारी संघटनेमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन अनेक महिन्यांपूर्वी जाहीर केली होती.. त्यामुळे ते विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे एकमताने निवडलेले उमेदवार होते.. त्यांना त्यांच्या संघटनेतून कुठेच विरोध नव्हता
विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 34 हजार 360 पत्रिकांपैकी 28 हजार मतमोजणीत पहिल्या पसंतीच्या मतामधील एक हजार 99 मते अवैध ठरली तर 26 हजार 901 मते वैध होती. 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी 19 जणांचं डिपॉझिट जप्त झाले.
सुनील केदार यांची चाल यशस्वी –
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शह देत सुनील केदार व विजय वडेट्टीवार यांनी रेटलेल्या सुधाकर अडबाले यांच्या विजयी वाटचालीनंतर नागपूरमध्ये नाना पटोले गट बॅकफूटवर गेला आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या वेळेस छोटू भोयर यांच्या वेळेस झालेली नाचक्की टाळण्यासाठी स्थानिक कॉंग्रेसी नेत्यांनी शिक्षक निवडणुकीत दबाव गट तयार केला होता. त्याच दबाव गटामुळे सुधाकर अडबाले यांच्या विजय सोयीस्कर झाल्याचे बोलले जात आहे.
विरोधकांचा भाजपावर हल्लाबोल
नागपूरमध्ये भाजपला पराभवाचा धक्का बसल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. देवेंद्रजी फडणवीस यांची जादू कोकणात चालली, महाराष्ट्रात चालली , जगभरात चालली मात्र नागपुर मध्ये का नाही चालली ? दया कुछ तो गडबड है असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
अमरावतीत धीरज लिंगाडे विजयाच्या मार्गावर
अमरावती पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले उमेदवार धीरज लिंगाडे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे दोन टर्म पासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे डॉ रणजित पाटील हे पराभवाच्या छायेत आहेत. दुसर्या फेरी अखेर लिंगाडे हे 1600 मतांनी आघाडीवर आहेत.
धीरज लिंगाडे बुलढाणा जिल्हाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते तर अमरावती पदवीधर मतदारसंघ कॉंग्रेस पक्षाला सुटल्याने कॉंग्रेस पक्षाने धीरज लिंगाडे यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेऊन त्यांना उमेदवारी दिली.
मराठवाड्यात विक्रम काळेंचा विजयी चौकार
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मविआचे उमेदवार विक्रम काळे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले. मतमोजणीच्या पहिल्या पसंतीचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नसल्याने दुसर्या पसंतीच्या मतमोजणीतही विक्रम काळे यांचीच सरशी झाली. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना एकूण 20 हजार 78 मते पडली. तर भाजपचे उमेदवार किरण काळे यांना 13 हजार 489 मते पडली. तर, शिक्षक संघटनेचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना 13 हजार 543 मते पडली आहे. यावेळी एकूण 2 हजार 485 मते बाद झाली.
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बळीराम पाटील यांचा पराभव केला. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत तब्बल 20 हजार 748 मते मिळाली. तर बाळाराम पाटील यांना 9768 मते मिळाली. एकूण 3002 मते अवैध ठरली आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयी मताचा 16 हजार मतांचा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.