नाशिक प्रतिनिधी
नाशिक जिल्हा परिषदेमधील एका वरिष्ठ विभागप्रमुखावर तब्बल ३० महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्यानंतर अखेर त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने निलंबनाचे आदेश दिले.
संबंधित विभागप्रमुखावर गेल्या दहा वर्षांपासून अधिकाराचा गैरवापर करून महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. कामाचा धाक, आमिष व कारवाईची भीती दाखवून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. अनेक महिला त्याच्या भीतीने तक्रार करण्यास टाळाटाळ करत होत्या, मात्र एका कर्मचाऱ्याने दिलेल्या पहिल्या तक्रारीनंतर इतर पीडित महिलांनीही पुढे येत आपले अनुभव सांगितले.
या प्रकरणातील वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. याच मुद्द्यावर विधान परिषदेत पावसाळी अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती.
दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनीही संबंधीत अधिकाऱ्यास निलंबित केले असल्याचे गावकरी शी बोलताना सांगितले.
या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहेनाशिक जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक व लैंगिक छळ झाल्याच्या गंभीर तक्रारीसंदर्भात सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, तसेच ज्या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार आहे त्याला आजच निलंबित करण्यात येईल,”
जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य