नाशिककरांनो, पाणी जपून वापरा

शनिवार, रविवार पाणीपुरवठा खंडित

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणीबाणीची स्थिती असून, महापालिका प्रशासनाकडून त्यावर उपाय म्हणून दुरुस्तीची कामे केली जात असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, पुन्हा एकदा येत्या शनिवारी (दि.10) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. रविवारी (दि. 11) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
तांत्रिक कामांसाठी पाणीपुरवठा दोन दिवस खंडित केला जाणार आहे. हेे काम शहरातील सर्व भागांतील विविध जलशुद्धीकरण केंद्रे व जलकुंभ येथे करावयाचे आहे. त्यामुळे सर्व जलशुद्धीकरण केंद्रे बंद ठेवण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे गंगापूर धरण रॉ-वॉटर पंपिंग स्टेशन, चेहेडी पंपिंग स्टेशन, मुकणे धरण पंपिंग स्टेशन बंद ठेवणे क्रमप्राप्त आहे. मॉन्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे उपकेंद्रातील विविध देखभालीची कामे करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे गंगापूर व मुकणे धरणातून या कालावधीत पंपिंग करता येणार नाही.
दरम्यान, मनपाची सर्व जलशुद्धीकरण केंद्रे बंद राहणार आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरामधील विविध जलशुद्धीकरण केंद्रे व जलकुंभ येथे स्काडा प्रणाली बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रे व जलकुंभ येथे करावयाच्या विविध कामांच्या अनुषंगाने, तसेच बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथील नव्याने उभारण्यात आलेल्या उपकेंद्राी चाचणी व कार्यान्वित करण्यासाठी स्मार्ट सिटीने शटडाउनचे नियोजन केले आहे. त्यामुळे येत्या शनिवारी (दि. 10) दिवसभर व रविवारी (दि. 11) सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *