जिल्हा स्थूल देशांतर्गत उत्पादनात नागपूरपेक्षा नाशिक आघाडीवर
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण 2025-26 मधील आकडेवारीनुसार नाशिक जिल्हा राज्यातील महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांपैकी एक म्हणून पुढे येत आहे. जिल्हा स्थूल देशांतर्गत उत्पादन या निकषावर नाशिक जिल्हा नागपूरपेक्षा पुढे असल्याचे अहवालातून दिसले आहे.
या अहवालानुसार 2024-25 मध्ये नाशिक जिल्ह्याचा नाममात्र जीडीपी दोन लाख 34 हजार 753 कोटी आहे. नागपूर जिल्ह्याचा जीडीपी दोन लाख 30 हजार 750 कोटी आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख अर्थिक केंद्रात नाशिकने नागपूरपेक्षा आघाडी घेतली आहे. स्थिर किमतीनुसारदेखील नाशिकची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे दिसते. 2024-2025 मध्ये नाशिकचा रिअल जीडीपी एक लाख 33 हजार 978 कोटी आहे, तर नागपूरचा एक लाख 34 हजार 326 कोटी आहे.
दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत नाशिक जिल्ह्याचे उत्पन्न तीन लाख 260 रुपये आहे. पुणे- चार लाख 26 हजार 720 रुपये, नागपूर- तीन लाख 67 हजार 805 रुपये, कोल्हापूर- तीन लाख 24 हजार 44 रुपये, तर सोलापूर दोन लाख 89 हजार 558 रुपयेआहे.
कृषी, द्राक्षे व कांदा उत्पादन, वाइन उद्योग, एमआयडीसीमधील वाढते उद्योग, तसेच पर्यटन क्षेत्रातील वाढ यामुळे नाशिक जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे. त्यामुळे मुंबई व पुण्यानंतर राज्यातील महत्त्वाच्या आर्थिक जिल्ह्यांत नाशिक वेगाने पुढे येत असल्याचे आर्थिक सर्वेक्षणातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
जीडीपीत नाशिक राज्यात तिसर्या स्थानी
राज्यात सर्वाधिक जीडीपी मुंबई जिल्ह्याचा नऊ लाख 13 हजार 316 कोटी आहे. त्यानंतर पुणे जिल्हा पाच लाख 34 हजार 695 कोटीसह दुसर्या क्रमांकावर आहे. नाशिक दोन लाख 34 हजार 753 कोटी असून, तिसर्या स्थानी आहे.
जीडीपी वाढीचा फायदा
जीडीपी वाढल्याने जिल्ह्यात गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. औद्योगिक वसाहती, उत्पादन, उद्योग, द्राक्ष, वाइन उद्योग, तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांना याचा सकारात्मक फायदा होणार आहे. जीडीपी वाढल्याने कररूपाने सरकारला अधिक महसूल मिळतो. त्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण व इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अधिक निधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
Nashik’s strong footprint in the state’s economy