नाशिक : प्रतिनिधी
शहरात नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला.शहरातील सर्वच चर्च आकर्षण रोषणाईसह बेल्स, फुगे, चांदण्यांनी सजवण्यात आले होते. विविध चर्चमध्ये नाताळनिमित्ताने आकर्षक आणि भव्य देखावे उभारण्यात आले होते. शनिवारी मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी करत नाताळ सणाचे स्वागत करण्यात आले.
शनिवारी (दि. 24) रात्री शहरातील सर्व चर्चमध्ये आणि ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी कॅरल सिंगिंग करीत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच प्रभू येशू जन्माचा सोहळा द्विभाषिक मिसा करण्यात आला. रविवारी सकाळपासून सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळी कॅरल सिंगिंगसह त्र्यंबकरोडवरील होली क्रॉस, कॅनडा कॉर्नर येथील संत आंद्रिया यांसह विविध चर्चमध्ये फादर यांच्या उपस्थितीत प्रभू येशूंच्या जन्माच्या सोहळ्याची मराठी आणि इंग्रजी भाषेतून मिसा (प्रार्थना) करण्यात आली.
नाताळला पवित्र सहभागिता विधी, महाउपासना करण्यात आली. द्विभाषिक मिसासह रात्री दहा वाजेपर्यंत बाळ येशूंच्या दर्शनासाठी चर्च खुले होते. धार्मिक गीतगायनासह केक वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
सर्व चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जन्माचा देखावा साकारण्यात आला होता. ख्रिसमस ट्रीला सजविण्यात आले होते. नववर्षाच्या स्वागतापर्यंत नाताळनिमित्ताने 1 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत.
चर्चबाहेर विविध
दुकाने थाटली
चॉकलेट, बेल्स, केकची खरेदी, बेल्स, ख्रिसमस ट्री, चांदणी, खेळणी, ख्रिसमस बॉल्स, चॉकेट्स आणि केकची खरेदी करण्यासाठी बांधवांनी गर्दी केली. चर्चबाहेरही दुकाने थाटण्यात आली होती.
सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
सोशल मीडियावर नाताळच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. स्टेट्स, मेसेजच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या.