सुमारे आठशे ग्रामपंचायतींकडून ठराव पारित, जिल्हा परिषदेचे पाऊल
नाशिक ः प्रतिनिधी
पतीच्या निधनानंतर महिलांवर होणार्या सामाजिक प्रथांचे विद्रूप आणि अमानवी रूप आता बदलण्याच्या दिशेने नाशिक जिल्हा परिषद निर्णायक पावले उचलत आहे. पारंपरिक स्वरूपात पतीपश्चात महिलांना बांगड्या फोडणे, मंगळसूत्र काढणे यांसारख्या प्रथा लादल्या जातात. या प्रथा महिलांच्या सन्मानावर घाला घालणार्या असून, त्यांच्या भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करतात. या प्रकारचे कोणतेही अवमानकारक कृत्य यापुढे होऊ नये, महिलांना सन्मान आणि समानतेची वागणूक मिळावी, या उद्देशाने जिल्ह्यातील ग्रामपंचायती पुढाकार घेत आहेत.
जिल्हाभरातील सुमारे 800 ग्रामपंचायतींनी एकमुखाने ठराव मंजूर करून, पती गमावलेल्या महिलांना ‘एकल’ ही ओळख सन्मानाची असल्याचा संदेश समाजात पोहोचवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. हा बदल ग्रामीण समुदायातून सर्वप्रथम उभा राहतोय, ही अत्यंत सकारात्मक आणि समाज परिवर्तनाची चिन्हे दर्शवणारी बाब आहे.
या पुढाकाराला अधिक बळ देण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेने ‘नवचेतना’ हे विशेष अभियान हाती घेतले आहे.
या अभियानांतर्गत एकल महिलांचे सामाजिक, आर्थिक, कौशल्य विकास आणि मानसिक पुनर्वसन यावर विशेष भर दिला जाणार आहे. महिलांच्या जीवनात स्थैर्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबन निर्माण व्हावे, त्यांना मुख्य प्रवाहात अभिमानाने सहभागी होता यावे यासाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा, समुपदेशन सत्रे आणि उद्योजकतेसाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या अभिनव उपक्रमामागील संकल्पना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची आहे. ग्रामीण समाजात महिलांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, भेदभावमुक्त वातावरण निर्माण करणे आणि एकल महिलांना अधिकारयुक्त जीवन देणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ग्रामपंचायती, महिला बचतगट, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि विविध विभागांच्या समन्वयातून हे अभियान प्रभावीपणे राबवले जाईल. जिल्हा परिषदेचा हा उपक्रम केवळ महिलांच्या सन्मानाची पुनर्प्रतिष्ठा करणार नाही, तर समाजातील जुने, गैरसंवेदनशील आणि भेदभावपूर्ण दृष्टिकोन बदलण्याच्या दिशेने ठोस पाऊल ठरेल. ‘नवचेतना’ अभियानामुळे नाशिक जिल्हा महिला सक्षमीकरणाच्या दिशेने नवा आदर्श निर्माण करणार असून, या उपक्रमाचे स्वागत सर्व स्तरांतून होत आहे.