रहिमन देख बडन को,
लघु न दिजिए डार.
जहाँ काम आवै सुई,
का करै तरवार
ही मोठ्या कामाची लहानशी सुई कितीक वर्ष जुनी आहे ठाऊक आहे? मानवी इतिहासातील अत्यंत प्राचीन आविष्कार आहे ही सुई. सुमारे 40,000 या त्याहून अधिक आधी हिचे निर्माण झाले असे मानले जाते. जेव्हा मानवाजवळ देह झाकण्यास काहीच नव्हते तेव्हा झाडांची मोठी पानं त्याने गुंडाळून पाऊस, थंडीपासून आपला बचाव केला असेल. एक पानं अपुरं वाटायला लागल्यावर दोन किवा अधिक पानं, अणकुचीदार काड्यांनी जोडून एक सामान्य पानांचे वस्त्र तयार केले असेल….तेच जोडणे कालावधीत सुई झाले असेल. सुरवातीच्या सुया म्हणजे लाकडी, हाडे किंवा शिंग इत्यादींच्या असतील कारण दक्षिण आफ्रिकेत कुठल्याशा गुहेत हाडांच्या सुईचे अवशेष मिळालेत. एका टोकाला छिद्र किंवा नेढे असलेली सुई साधारणत 25000 वषार्ंपूर्वी अस्तित्वात आली असे पुरावे रशिया आणि चीन च्या उत्खननात मिळालेत. धातूंपासून निर्मित सुईचा वापर इ.स.पूर्व 4400 च्या दरम्यान इजिप्तमध्येे सुरू झाला. आरंभिक सुई तांब्याची होती. नंतर लोखंडी झाली. आज शिलाई मशिनची सुई आपण बघतो तिचा शोध 1755 मध्ये जर्मन संशोधक कार्ल विसेन्थल याने लावला.
हा सुईचा इतिहास. तसे पाहिल्यास जराशी सुई कितीक सामान्य दिसते, पण आजपर्यंत तिने माणसाला देह झाकण्यास मदत केली आहे. लज्जानिवारण करण्यास तिनेच प्रेरित केले आहे. क्षुल्लक वाटणारी ही सुई जोडण्याचे काम करते. वस्त्र जोडून नेसण्याजोगे करते, फाटलेल्या वस्त्रातून देहदर्शन होऊ नये म्हणून ते शिवते, तुटलेले जोडते आणि विस्कळीत झालेले नीटसे करते. कुटुंबात, समाजात, संस्कृतीत, आणि साहित्यातही सुई हे एकात्मतेचे प्रतीक आहे.
कुटुंबातील सुई कोण असते? हे सर्व विदित आहे. कुटुंबातील मुख्य पुरुष आणि स्त्री म्हणजेच आई. वडील हे सुईचे निमुळते अणकुचीदार टोक आहेत, ते टोचून बोलणार आणि आई स्वतःला छिद्र पाडून त्यात सूत्र लावून ते शिवण्याचे काम करते. ती कुटुंबात कुणालाच विलग होऊ देत नाही. भावंडातील भांडणं, नात्यातील दुरावे ती फक्त जोडण्याचे काम करते. एका पिढीला दुसर्या पिढीशी जोडण्याचे कर्तव्य आई पार पाडते आणि आपले उत्तरदायित्व ती आपल्या मुलीला आणि सुनेला सोपवून जाते. जसे लहानशा सुई मुळे वस्त्र टिकून रहाते त्याचप्रमाणे आईमुळे कुटुंबातील एकता टिकते.
भारतीय संस्कृतीत शिवणकाम हे फार पूर्वीपासून होत होते. राजा-महाराजांचे रेशमी, सोन्याचे जरीकाम केलेले भरजरी वस्त्र, चांदीचे भरजरी काम केलेले मोठे पडदे, चादरी, गालीचे हे सर्व त्याकाळात हातानी आणि सुईच्या सहाय्याने तयार करत असत. भारतीय रेशमी भरजरी वस्त्रांची मागणी सर्वत्र होती. भारतीय कुशल शिंपी, जरीकामात खूप हुशार होते. सुरेख नक्षीकाम आणि सोन्या-चांदीच्या तारांचा वापर करून ते अद्भुत अप्रतिम वस्त्र निर्माण करत होते. आपल्या देशातील वस्त्र, परदेशातही खूप प्रसिद्ध होते. विणकामातही सुयांचा उपयोग होतो. थंडीत वापरात येणारे ऊनी वस्त्र, पूर्वी घरोघरी स्त्रिया दोन सुयांनी विणत असत. त्यावर इतके सुंदर डिझाईन टाकत असत की बघणारा आश्चर्यचकित होत असे. क्रोशिया हा प्रकार ही खूप नावाजलेला आहे. भारताव्यतिरिक्त अनेक देशातून लोक क्रोशियाच्या एका विशिष्ट सुईने अप्रतिम विणकाम करतात.
आपण एका विविधतेत रंगलेल्या समाजात राहातोय. या समाजात अनेक मतभेद आहेत. त्याशिवाय धर्म, भाषा, संस्कृती, चालीरीती, राहणीमान खूप भिन्न आहे तरीदेखील हा आपला समाज एकत्र मिळून रहातोय, जगतोय, काम करतोय….कोठेतरी एका अदृश्य सुईने शिवणकाम करून आपल्याला बांधून ठेवलंय. अगदी शेजारीच राहणारा इतर धर्माचा असलातरी आपण शेजारधर्म निभावतो आणि तोदेखील कुठल्याही प्रसंगाला धावून येतो. ही गुंफण करणारी सुई निश्चितच कोठेतरी असेल. विचारांना एकत्र आणणारी सुई, स्वार्थाच्या फटींना शिवणारी सुई हे म्हणजे संवेदनशील आणि गंभीर माणसं. ही माणसं, सुई प्रमाणे स्वतःला टोचून घेतात, कष्ट करून घेतात, वेळप्रसंगी अपमान ही सहन करतात, पण त्याचबरोबर समाज सुधारित करतात जोडतात.
समाजसुधारक, संत, कथावाचक, कवी लेखक हे समाजाचे शिंपी आहेत. संताची वाणी सुईचे काम करते. सांस्कृतिक वारसा पुढे नेते. कथावाचक, श्रोत्यांपर्यंत सद्भाव आणि सौहार्द पोहोचवून त्याच्या मनाला सहज करतो आणि परमेश्वरासोबत जोडून टाकतो. कवी आणि लेखकांचे शब्द हे धागे आहेत आणि लेखणी म्हणजेच सुई आहे. लोकांच्या मनोभावना, मतभेद, संवेदना अनाहूतपणे जोडून ते एक सजीव कथानक तयार करतात, एखादी सुंदर कविता म्हणजे जणू मनाच्या निरागस वस्त्रावर केलेले नाजूक नक्षीकाम.
संत कबीरदास हे विणकर होते. सुई, धागा, कात्री हेच त्यांचे जीवन होते, पण त्यांनी सुईच्या सान्निध्यात राहून काय अप्रतिम काव्यरचना केल्या आहेत. तेसुद्धा म्हणतात की…
सुई बनो तो जोड़िये,
कैंची बनो न कोय।
कैंची काटे प्रेम को,
सुई जोड़े सो होय ॥
needle
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…