पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच…. एक -एक पात्र अतिशय विनोदी… तर अशीच आमच्या कॉलनीत सगळ्या मराठी भाषिकांमध्ये एक हिंदी भाषिक मैत्रीण शेजारी राहते…. तर या मैत्रिणीला तोडकीमोडकी मराठी येते.. आणि आमच्या कॉलनीतल्या महिला मंडळाची हिंदी तर विचारूच नका… आम्ही हिंदीचा कोथळाच बाहेर काढतो.
जेवण हुआ क्या?… आवर के हुआ क्या?.. जेवण में क्या बनाया?… असा रोजचा संवाद… दुपारच्या रिकाम्या वेळात आम्ही सगळ्या थोड्या गप्पाटप्पा मारण्यासाठी तिच्या घरी जमलो तेव्हा तिने लिंबाच्या लोणच्याची रेसिपी विचारली.. आणि आम्ही तिला आमच्या भयानक हिंदीत ती रेसिपी सांगितली… अर्धा किलो पिवळे लिंबू लेनेके… उसको स्वच्छ पाणी से धुऊन घेनेका और कोरडे कपडे से पुसनेका बाद मे उसको कुकर मे एक शिट्टी मारके उकडनेका… और आधा किलो लिंबू के हिसाब से मीठ-मसाला डालनेका… अच्छे से मिक्स करके स्वच्छ बरणीमे भरनेका… इतक्या भयानक हिंदीत सांगितलेली रेसिपी तिनेदेखील मन लावून ऐकली… आणि दुसर्‍याच दिवशी लिंबूका लोणचं हमके घर वानोळा म्हणून आया. एकदा तर तिच्या मिस्टरांचा हात त्यांच्या कंपनीत असलेल्या मशिनमध्ये अडकला आणि त्यांची दोन बोटांची पुढची पेरं तुटली… आम्ही आपल्या मराठीत विचारतात तसं.. की काही समजलंच नसेल ना की बोटं मशिनमध्ये कशी अडकली ते.. याचं जसंच्या तसं हिंदीत रूपांतर केले… के आपको समझ मे ही नहीं आया होगा ना की बोटं मशिनमे कैसे अडके ऐसा… तर त्यांनी आम्हाला निरुत्तरच केले की… समझ मे आता तो उंगली डालता ही क्यूँ मशिन मे…. पुन्हा सहाएक महिन्यात त्यांची दुसर्‍या हाताची बोटं अडकली…. त्यामुळे त्यांना चारचाकी चालवता येत नसल्यामुळे ते पायी चालले होते… तर अभी अच्छे है क्या असं थोडक्यात विचारपूस केली…. त्यांनाही बहुतेक हायसे वाटले असेल, असं त्यांच्या चेहर्‍यावरच्या हावभावांवरून वाटले… कारण त्यांनी कल्पना केली असेल की, या सगळ्या विचारतात की काय.. पाव पाव किधर जा रहे है।
असाच एकदा माझा हात मुरगळला.. तर तिने मला विचारलं की आपके हात मे बहुत पेन है क्या?… ती काय विचारते ते कळलं…. पण मनात म्हटलं बाई इथे एक पेन धरायची पंचाईत बहुत पेन का तो विषयच नाही.
अशीच एकदा आमच्या कॉलनीतल्या मैत्रिणीच्या सासूबाई घरात पाय घसरून पडल्या.. त्यांच्या गुडघ्याला खूपच लागले…पायाला प्लास्टर केलेले..आम्ही सगळ्या मैत्रिणी हॉस्पिटलमध्येे त्यांना भेटायला गेलो. अर्थातच आमची हिंदी भाषिक मैत्रीण सोबत होती… तिने मैत्रिणीला खूप काळजीच्या स्वरात विचारले… ये सब कैसे हुआ… आमच्या मैत्रिणीने हिंदीची तिथेच चिरफाड केली.. वो क्या हुआ.. फरशी थोडी ओली थी आजी उस पर से घसरके गीर गई और उनके गुडघे की वाटी फूट गई… पुढे आमची हिंदी भाषिक मैत्रिणीला काळजीच्या स्वरात म्हणाली…उनको कांच की वाटी क्यूँ दी… स्टील की देणे की… अभी उमर हो गई है ना तो संभालने में मुश्किल होती है… आता फक्त डोके की वाटी फिरने का बाकी रहा था. अभी मैं लिहून लिहून बहुत दम गई… क्यूँ की विषय बहुत मोठा है… अशी आमची पडोसनशी मराठी-हिंदी जुगलबंदी नेहमीच चालू असते.

neighborhood

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *