नव्या गाड्या दिसेना अन् जुन्या नीट चालेना

लासलगाव आगाराची बस कोठे बंद पडेल याचा नाही भरवसा

निफाड : तालुका प्रतिनिधी
लासलगाव आगाराच्या बसगाड्या आता ग्रामीण भागाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. जेथे या गाड्या जातील तेथे कोठे अन् कधी बंद पडतील, याचा भरवसा नाही. या बसगाड्यांचा खुळखुळा झालेला असतानाच शासनाने नव्याने दिलेल्या गाड्यादेखील कोठे गायब झाल्या, याचे उत्तर मिळत नाही. एकीकडे सीएनजी तसेच इलेक्ट्रिकवर चालणार्‍या बसेस शहरात प्रवासी वाहतूक करत असताना ग्रामीण भागात मात्र नादुरुस्त गाड्यांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
ब्रिटिशकालीन आगार म्हणून लासलगाव आगाराची नोंद होते. सध्या या आगाराकडे 42 बसगाड्या आहेत. यात दहा नवीन एशियाड गाड्या असून, आणखी पाच गाड्या सिन्नर आगाराच्या आलेल्या आहेत, या पाच गाड्यापैकी एक हिरकणी, तर चार गाड्याही नवीन मॉडेलच्या आहेत. उर्वरित 27 गाड्या जुन्या आहेत. यातही नवीन गाड्यांना सेन्सॉर असल्याने त्यांचा फॉल्ट शोधायचा म्हणजे या गाड्या कॉम्प्युटरवर जोडल्यावरच समजतो. आगाराचे उत्पादन वाढले पाहिजे यासाठी नवीन गाड्यांपैकी तुळजापूरला जाणार्‍या दोन गाड्या, तर पुणे येथे जाणार्‍या दोनव्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर, धुळे, अमळनेर येथेही नवीन गाड्या प्रवासी वाहतूक करतात.
बस कर्मचार्‍यांच्या मते नवीन गाड्या दररोज किमान पाचशे किलोमीटर चालल्या पाहिजेत.त्यामुळे खेडेगावात धावणार्‍या बसचा तोटा भरून निघण्यास मदत होते.
अनेक वेळा या बस उशिरा येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, तर चाकरमान्यांना नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. पावसाळ्यात तर बर्‍याच बस गळक्या असल्याने प्रवाशांंना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात खुळखुळा झालेल्या बसमधून प्रवास म्हणजे वेळेवर पोहोचलो तर भाग्यच समजावे.
तालुक्यात जेथे बससेवा चालू तेथे नवी बस दिसत नाही अन् जुनी बस वेळेवर येत नाही अन् उशिरा आलेल्या बसचे सीट व्यवस्थित असेलच याची खात्री नाही. प्रवासाच्या सेवेसाठी ब्रीदवाक्य असलेल्या बसचा प्रवास हा यापुढे तरी सुरक्षित व्हावा, अशी सामान्य प्रवाशांची अपेक्षा आहे.

लासलगाव आगाराकडे 17 बस जुन्या आहेत; परंतु त्या चांगल्या आहेत. शेवटी मशिन आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस बसला खोळंबा होऊ शकतो. मात्र, नियमित बंद पडते असे नाही. या बस जुन्या असल्या तरी त्यांची दुरुस्ती केलेली आहे. सर्व बस वेळेवर धावतात. प्रवाशांचादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– सविता काळे, बस आगारप्रमुख, लासलगाव

लासलगाव- मनमाड बस कधीच वेळेवर नसते. एकदा तर बसमध्ये बसल्यानंतर सर्व प्रवाशांना उतरून देत बस येवला येथे जाणार आहे, असे सांगितले. एकदा मी ऑनलाइन तिकीट काढले. मात्र, त्या दिवशी बस आलीच नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसचे दरवाजे, खिडक्या तुटलेल्या असतात. बसेसमधील सीट व्यवस्थित नसतात आणि वेळेवरही येत नाही.
– प्रा. वृषाली गागरे पाटील, प्रवासी, लासलगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *