आयुक्त जाधव : मसगा महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा
मालेगाव : प्रतिनिधी
भारतासारख्या समृद्ध लोकशाहीचा खरा कणा हा नवमतदार आहे. जेन झी म्हणून ओळखली जाणारी तरुण पिढी लोकशाहीच्या या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेत आहे. युवकांनी स्वतः मतदान करावेच, तसेच आपल्या कुटुंबीयांना, शेजार्यांना व मित्रमंडळींनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे, जेणेकरून योग्य उमेदवाराची निवड होऊन शहराच्या विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी केले.
मालेगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अभियानांतर्गत शुक्रवारी (दि. 9) मसगा महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
स्पर्धेत शहरातील नऊहून अधिक महाविद्यालयांनी सहभाग घेतला. प्राथमिक फेरी संबंधित महाविद्यालयांमध्ये पार पडून उत्कृष्ट तीन विद्यार्थ्यांची निवड केली होती. त्यानंतर मसगा महाविद्यालयातील लोकनेते व्यंकटराव हिरे सभागृहात अंतिम फेरी पार पडली. अंतिम फेरीसाठी 21 स्पर्धकांची निवड केली होती. मसगा महाविद्यालय, प्रशांतदादा हिरे फार्मसी महाविद्यालय, महिलारत्न पुष्पाताई हिरे महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, शारीरिक शिक्षणशास्त्र विद्यालय आदी महाविद्यालयांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.
स्पर्धेत कावेरी मनोहर निकम हिने प्रथम क्रमांक पटकावला. वैष्णवी दीपक काळे हिला द्वितीय, तर गीतांजली निकम हिला तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्यांना रोख बक्षीस सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विद्यार्थिदशेत आपण परीक्षांमध्ये अनेक पर्यायांमधून योग्य उत्तर निवडतो आणि यशस्वी होतो. त्याचप्रमाणे लोकशाहीच्या परीक्षेत मतदानाद्वारे योग्य उमेदवार निवडल्यास त्याच्या माध्यमातून शहरासह देशाचा विकास साधता येतो. त्यामुळे प्रत्येक तरुणाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन आयुक्तांनी केले. या
स्पर्धेसाठी मसगा महाविद्यालयाच्या वादविवाद समितीचे प्रमुख डॉ. डी. एन. सोनवणे यांच्यासह डॉ. विनोद गोरवाडकर, डॉ. रमेश निकम, डॉ. पंकज पवार, डॉ. नरेंद्र डोखे व डॉ. चंद्रशेखर निकम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास मसगा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल सावळे, मनपा उपायुक्त पल्लवी शिरसाठ, शहर अभियान व्यवस्थापक रोहित कन्नोर, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, लिपिक समृद्धी हिरे, समुदाय संघटिका हिरकणी वाबळे, डॉ. मनीष सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण डॉ. विनोद गोरवाडकर, डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे आदींनी केले. प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. लीना पगारे यांनी केले. आभार प्रा. रामेश्वर पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नवमतदारांना जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे यांनी मतदानाची शपथ दिली.
New voters should take the initiative and increase the voting percentage.