कठोर शिक्षेची संतप्त नातेवाइकांची मागणी
पंचवटी : प्रतिनिधी
हिरावाडीतील नवविवाहिता नेहा संतोष पवार (वय 27) हिने विवाहानंतर अवघ्या पाच महिन्यांनंतर सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळ तसेच चारित्र्याच्या संशयामुळे आत्महत्या केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती, सासू व तीन नणंदा यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ, मानसिक छळ तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
मृत नेहा हिच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, पती संतोष पंडित पवार, सासू जिजाबाई पंडित पवार, नणंद शीतल अशोक आहिरे, मीनाक्षी शीतल आहिरे, भारती दत्ताराम पवार यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
हिरावाडीतील सिद्धेश्वरनगर येथे बुधवारी दुपारी नेहा पवार या नवविवाहितेने टेलफॉस नावाचे विषारी औषध सेवन केले होते. तत्पूर्वी, तिने लग्नानंतर पाच महिन्यांत पतीसह सासरच्या लोकांनी केलेल्या छळाची कहाणी सहा फुलस्केप पानांवर लिहून ठेवली होती. या चिठ्ठीचे फोटो तिने भावाच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. तसेच भावाला फोन करून व्हॉट्सअॅप पाहा, असे सांगितले होते. दरम्यान ,विषप्राशन केल्यानंतर तिला उलट्या होऊ लागल्याने नणंदेच्या मुलाने तिच्या भावाला कळवले. भाऊ घरी पोहोचल्यावर नेहाला हॉस्पिटलमध्ये हलवले. तोपर्यंत तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याची माणुसकीही सासरच्यांनी दाखवली नव्हती. नेहाचा मृत्यू झाल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी चिठ्ठी व इतर साहित्य जप्त करून तपासास प्रारंभ केला. नेहाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार तसेच नेहाने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल केला.
नेहा पवार हिचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे तपासात व मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले आहे. शारीरिक व मानसिक छळ, औषधोपचार न करणे, माहेरून पैसे आणावेत यासाठी टोमणे मारणे, माहेरचे नातेवाईक मृत झाल्यानंतर जाऊ न देणे, चारित्र्यावर संशय यास कंटाळून नेहा हिने विषारी औषध प्राशन केले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल तसेच भावाच्या तक्रारीन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीसह पाच आरोपींना अटक केली आहे. विनाविलंब गुन्हा दाखल केला असून, लवकरात लवकर दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात येईल.
– सुनील पवार, पोलीस निरीक्षक, पंचवटी पोलीस ठाणे
’आरोपींना कठोर शासन करा’
नेहा हिने लिहून ठेवलेली चिठ्ठी अक्षरशः अंगावर शहारे आणणारी होती. या चिठ्ठीतील मजकूर वाचून नेहाचे संतप्त नातेवाईक गुरुवारी सकाळी पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी महिलांना भावना अनावर झाल्या होत्या. आरोपींना कठोर शिक्षा द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल झाला असून, आरोपींना अटक झाल्याचे सांगितल्यानंतर नातेवाइकांचा राग शांत झाला.