उमरेमाळ येथे शेततळ्यात नवविवाहितेचा मृत्यू

नातेवाइकांचा घातपाताचा संशय

सुरगाणा ः प्रतिनिधी
सुरगाणा शहरापासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावरील वणी ते सुरगाणा रस्त्यावर उमरेमाळ येथील नवविवाहिता कावेरी योगेश जाधव (वय 20, माहेरचे नाव कावेरी लक्ष्मण भरसट, गाव बेंदीपाडा, ता. कळवण) हिचा घरालगत असलेल्या शेततळ्यात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. माहेरच्या नातेवाइकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरी हिचा विवाह योगेशबरोबर गेल्या मे महिन्यात 20 तारखेला झाला होता. योगेश हा नोकरीनिमित्त मुंबई येथे राहत होता. 25 जून रोजी सकाळी सव्वासात वाजेपूर्वी गावातील व्यक्ती दिलीप देशमुख यांना एका महिलेचा मृतदेह गावाच्या उत्तरेस लगतच्या शेततळ्यात तरंगत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी तत्काळ हट्टी येथील पोलीसपाटील मधुकर चौधरी यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले. पोलीसपाटील यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, शेततळ्याच्या 25 ते 30 मीटर अंतरावर घर असलेली नवविवाहिता कावेरी हिचा मृतदेह उलट्या उभड्या अवस्थेत पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शव शेततळ्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, पोलिसांना कावेरीच्या वहीमध्ये एक चिठ्ठी आढळून आली असून, त्यात लिहिले आहे की, कोणाच्या दबावाखाली येऊन किंवा त्रासामुळे नाही, तर मी स्वतः माझे आयुष्य संपवत आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये. माझ्या मृत्यूला स्वत: जबाबदार आहे, असा मजकूर चिठ्ठीत असून, पोलिसांनी चिठ्ठी हस्तगत केली आहे. कावेरी हिचे शिक्षण डी.टी.एड पूर्ण झाले असून, शिक्षक पात्रता टेट परीक्षा तिने दिली होती. चिठ्ठीतील तिचे हस्ताक्षर व सहीची खातरजमा पोलीस करीत आहेत. चिठ्ठीतील हस्ताक्षर तसेच सही तिची नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. पती योगेश जाधव यास मुंबई येथून येण्यास उशीर झाल्याने साडेपाच वाजेच्या दरम्यान शवविच्छेदन करण्यात आले. बेंदीपाडा येथील नातेवाइकांनी पती योगेशला शव ताब्यात घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेऊ देणार नाही, अशी मागणी केली. त्यामुळे उशिरापर्यंत ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कावेरीचा मृत्यू नेमका कसा झाला, चिठ्ठीतील हस्ताक्षर तिचेच आहे का? शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सत्य समोर येईल. उमरेमाळ गावात तणावाचे वातावरण असून, पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे, तुळशीराम चौधरी, पंडित खिरकाडे, भास्कर भोये करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *