निफाड बसस्थानक, आठवडे बाजार चोरीचे केंद्र

75 वर्षांच्या आजीबाईंच्या सोन्याच्या पोतवर चोरट्याचा डल्ला

निफाड ः तालुका प्रतिनिधी
निफाड बसस्थानक आणि आठवडे बाजारात महागडे दागिने मोबाइल चोरीला जाण्याचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी (दि. 9) दुपारी 4.20 च्या सुमारास नांदूरमध्यमेश्वर येथील आजीबाई शिवरे फाट्यावर उतरण्यासाठी लासलगाव बसमध्ये बसत असताना चोरट्याने त्यांची सोन्याची पोत तोडून पोबारा केला. निफाडचा आठवडे बाजार आणि बसस्थानकात महिलांचे दागिने ओरबाडणेे, पर्स हातोहात लांबविणे, मोबाइल चोरणे असे प्रकार आता नित्याचे झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, नांदूरमध्यमेश्वर येथील मोलमजुरी करणार्‍या मंदाबाई रंगनाथ डांगले (वय 75) या बंधूंच्या वर्षश्राद्धासाठी गुरुवारी गणूर (ता. चांदवड) येथे गेल्या होत्या. शुक्रवारी कार्यक्रम आटोपून निफाडपर्यंत आल्या. मात्र, सायंकाळच्या सुमारास नाशिक-लासलगाव बस येताच आजीबाई गर्दीत बसमध्ये चढल्या व त्यांनी शिवरे फाट्याचे तिकीट काढले. सदरचे तिकीट त्यांनी कमरेच्या पिशवीत टाकले, तर शिवरे फाटा येताच त्या बसमधून उतरल्या. नांदूरमध्यमेश्वरकडे जाणार्‍या गाडीची वाट पाहत थांबणार तोच त्यांच्या लक्षात आले की, गळ्यातील पोत चोरट्याने लांबवली आहे.
निफाडमध्ये आले तेव्हा पोत होती अन् बसमध्ये बसताना आणि इथपर्यंत येईपर्यंत दोन तोळ्यांची पोत चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर त्या तेथेच रडत बसल्या. दरम्यान, दैनिक ’गांवकरी’चे प्रतिनिधी आनंद जाधव तेथून मोटारसायकलने जात असताना परिसरातील महिलांनी आजीबाईर्ंबद्दल आपबिती सांगितली. जाधव यांनी यांनी तत्काळ बसस्थानकप्रमुख गवळी यांच्याशी फोनवर संवाद साधत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितले. याबाबत आजीबाईंच्या मुलांनादेखील या घटनेची माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

…अन् आजीबाईंना रडू कोसळले

शेतकर्‍यांकडे मोलमजुरी करून आजीबाईंनी पोत बनवली होती. मात्र, चार-पाच वर्षांच्या मेहनतीनंतर बनवलेली पोत क्षणात चोरीस गेल्याने त्यांना रडू कोसळले. दरम्यान, निफाड बसस्थानकात चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, येथील आठवडे बाजारातदेखील चोरट्यांचे प्रमुख केंद्र बनू पाहत आहे. निफाडमध्ये भुरट्या चोर्‍या व वाहने चोरीला जाण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे या चोरट्यांवर वचक प्रस्थापित करण्याचे काम निफाड पोलिसांना करावे लागणार आहे.

Niphad bus stand, a hub for theft from weekly market

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *