वीजपुरवठा खंडित; शेतकर्यांची तारांबळ
निफाड ः प्रतिनिधी
काल बुधवारी दुपारनंतर तालुक्यात बेमोसमी पावसाने अचानक हजेरी लावत शेतकर्यांची तारांबळ उडवून दिली. विजांच्या कडकडाटात धुवाधार पावसाला सुरुवात होताच निफाडसह परिसरातील गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
दरम्यान, पाऊस पडता झाल्याने शेतकरी खरीप हंगाम पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामांत व्यस्त झाला असतानाच, कालच्या पावसामुळे निफाड, हिवरगाव, सायखेडा बाजार आवारात पाणी साचल्याने दुपारनंतर शेतमाल लिलाव प्रक्रिया काहीशी विस्कळीत झाली होती. काल बुधवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान भरवस फाटा, विंचूर, उगाव, वनसगाव, सारोळे खुर्द, रानवड, पालखेड या परिसरातून सुरू झालेल्या पावसाने नंतर निफाड, कोठुरे, म्हाळसाकोरेसह तालुक्याचा उर्वरित भाग कवेत घेत चौफेर हजेरी लावली. अवेळी आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकर्यांची तारांबळ उडाली. बाजारपेठेत व्यावसायिक आपला माल झाकण्यात व्यस्त झाले. तालुक्यात म्हाळसाकोरे, खेडलेझुंगे येथील आठवडे बाजारात आलेले व्यावसायिक ग्राहक यांची या पावसामुळे धावपळ उडाली. परिणामी, ज्या शेतकर्यांचा कांदा शेतातून काढणे बाकी आहे, तो कांदा आता खराब होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावणे सुरू ठेवल्याने आणि काल बुधवारी मात्र जास्तच बरसल्याने कोरड्याठाक पडलेल्या विहिरी, पाझर तलाव यांना पाणी उतरण्याची शक्यता तयार झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट टाळण्यास मदत झाली असून, हवेत गारवा तयार झाल्याने उन्हाच्या उकाड्यापासून काहीकाळ नागरिकांची सुटका झाली आहे. निफाडमध्ये दुपारी 3.15 वाजता सुरू झालेल्या पावसाने 4.30 वाजता विश्रांती घेतली. पाऊस व वाहतूक कोंडी नित्याचीच पावसाला सुरुवात होताच निफाडच्या बसस्थानकापासून ते शांतीनगर चौफुलीपर्यंत वाहतुकीची होणारी कोंडी आता नित्याची झाली आहे. कालदेखील याचा प्रत्यय आला. कारण शहरातील पाणी याच ठिकाणी येऊन ते रस्त्यावरून वाहते. तर काँक्रीटच्या रस्त्यावर आणि साइडपट्टी खोल यामुळे वाहनचालक वाहने रस्त्याच्या खाली उतरविण्यास धजावत नाही. उगाव रोड, उपबाजार आवार, बसस्थानक आणि शहरासह पिंपळगाव रोडने येणारी वाहने याच ठिकाणी येतात. त्यामुळे वाहनांची गर्दी होऊन अनेक वेळा रहदारी ठप्प होते.